२०१८ मध्ये ६.६ टक्के विकास दर ’ डिसेंबरअखेर तिमाहीत नाममात्र घसरण ’ १९९० नंतर किमान स्तरावर

बीजिंग : चीनचा आर्थिक विकास दर २०१८ मध्ये ६.६ टक्के नोंदला गेला असून तो गेल्या २८ वर्षांतील नीचांकी स्तरावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेबरोबरचे व्यापार युद्ध व निर्यातीत झालेली घसरण यामुळे हा दर यंदा खूपच खालावला आहे.

डिसेंबर २०१८ ला संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.४ टक्के होता; तो गेल्याच्या तिसऱ्या तिमाहीतील ६.५ टक्क्य़ांच्या तुलनेत किरकोळ कमी होता.

चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असून देशाचा विकास दर आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनच्या ‘नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या संस्थेने म्हटले आहे की, चीनचा आर्थिक विकास दर २०१८ या संपूर्ण वर्षांमध्ये ६.६ टक्के होता. तर तुलनेत  गेल्या वर्षी (२०१७) वाढीचा दर अधिक, ६.८ टक्के होता.

यापूर्वी, १९९० मध्ये चीनचा आर्थिक विकास दर ३.९ टक्के नोंदला गेला होता. २०१८ मधील आर्थिक विकास दर ६.६ टक्के नोंदला गेला असला तरी तो अंदाजे अपेक्षित दरापेक्षा जास्तच होता. अपेक्षित आर्थिक विकास दर ६.५ टक्के होता. चौथ्या तिमाहीत विकास दर ६.४ टक्के होता, तर तिसऱ्या तिमाहीत तो ६.५ टक्के होता.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार..

चीनच्या आर्थिक घसरणीचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवरही होणार असून अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनची पीछेहाट झाली आहे.

२०१८ मध्ये उभय देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झाले असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवले आहे. अमेरिकेने चीनच्या २५० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर आकारला असून चीनने अमेरिकेच्या ११० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर कर वाढवला आहे.

२०१७ मध्ये चीनचे देशांतर्गत उत्पन्न ८२.०८ लाख कोटी युआन (१२.१३ लाख कोटी डॉलर्स) होते. ते गेल्या वर्षांत, २०१८ मध्ये ६३६.७ अब्ज युआन (९३.९ अब्ज डॉलर्स) अपेक्षित होते.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटीझर व चीनचे उपपंतप्रधान लिउ हे यांच्यात १ मार्चपूर्वी सामंजस्य झाले नाही तर अमेरिका चीनच्या वस्तूंवर आणखी कर आकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्यंतरी तणाव शिथिल होण्याची चिन्हे आहेत.