बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी चीनने त्याचे चलन युआनचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १.६२ टक्क्यांनी अवमूल्यन करून सबंध जगभरात अर्थविश्वात खळबळ निर्माण केली. मंगळवारीही युआनच्या केल्या गेलेल्या २ टक्के अवमूल्यनाने चिनी चलन प्रति डॉलर ६.३३०६ या दोन दशकांपूर्वीच्या नीचांक स्तराला पोहोचले आहे. युआनच्या घसरणीचे पडसाद म्हणून रुपयाने डॉलरमागे ६४.७८ अशी मोदी सरकार येण्यापूर्वीचा म्हणजे सप्टेंबर २०१३ च्या पातळीवर लोळण घेतली.
आर्थिक वृद्धीला कमालीची ओहोटी लागलेल्या चीनने निर्यातीला प्रोत्साहन म्हणून टाकलेल्या या पावलाचे एकीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्वागत केले असले तरी, भारतासह विकसित अमेरिका व युरोपीय राष्ट्रांनी धास्ती व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या परिणामी विकसित देशांमधून आयात करणे महागडे बनेल, तर चीनमधून होणारी निर्यात स्वस्त ठरेल. यावर आशियाई, अमेरिका व युरोपच्या भांडवली बाजारातही बुधवारी निर्देशांकांच्या आपटीचे प्रतिकूल परिणाम दिसून आले. सेन्सेक्स तब्बल ३५४ अंशांनी गडगडला.
भारताने स्वस्त चिनी आयातीला थोपविण्यासाठी बुधवारपासून निवडक पोलाद उत्पादनांवरील आयातशुल्कात अडीच टक्क्यांची वाढ केली. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा पोलाद आयात महाग करणारे पाऊल सरकारने टाकत, देशांतर्गत उत्पादकांच्या बचावाचा पवित्रा घेतला आहे. तथापि आधीच जागतिक बाजारातील मलूलतेने हैराण भारतीय निर्यातदारांनी घसरत्या युआनबाबत चिंतेची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.