देशाच्या बाजारपेठेत चीनमधून येणाऱ्या उत्पादनांचा दबदबा असताना व्हिवो फोनचा उत्पादन प्रकल्प भारतातच सुरू करण्याचा विचार ही चिनी कंपनी करीत आहे. येत्या काही वर्षांमध्ये व्हिवो फोनचे उत्पादन सुरू करण्यात येईल, असा व्हिवो इंडियाचे सरव्यवस्थापक ट्रॅसी शेन यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. लवकरच येथे प्रकल्पाची सुरुवात करणे हे आमच्या व्यवसाय वृद्धी कार्यक्रमाच्या टप्प्यात अग्रक्रमाने असेल, असेही ते म्हणाले. 

विवोने देशातील पहिले फोन विक्री दालन सुरू केले आहे. भारतात मोबाइल उत्पादन सुरू करण्यासाठी यापूर्वी मायक्रोमॅक्स, लावा, शिओमी, आसुससारख्या कंपन्यांनीही रस दाखविला आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमार्फत लोकशाही आघाडी सरकारनेही भारतात प्रकल्प सुरू करून देशात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देऊ केले आहे. त्यासाठी भांडवली अनुदान तसेच कर लाभही देण्याची घोषणा करण्यात आली आहे.