सप्ताहारंभी सबंध जगभरातील भांडवली बाजारांच्या  निर्देशांकांना घसरणीचा हादरा देण्यास कारणीभूत ठरलेल्या चिनी भांडवली बाजारातील उत्साह सप्ताहाअखेरही परतल्याचे आढळून आले. येथील प्रमुख निर्देशांकांनी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविताना जवळपास २ टक्क्यांची वाढ राखली.
चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपातीचा दुसरा फेराही चालू आठवडय़ातच चालविला. परिणामी निर्देशांकांनी पुन्हा एकदा वाढीने त्याचे स्वागत केले. गेल्या दोन व्यवहारात निर्देशांक उंचावले आहेत.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हने सप्टेंबरमधील व्याजदर वाढीबाबत संकेत दिल्याने चीनसह एकूणच आशियाई बाजारात गेले दोन दिवस वाढीचे वातावरण आहे. युरोपातील बाजारातही यामुळे तेजीची नोंद झाली आहे.
गुरुवारीत तब्बल ५.३४ टक्क्यांनी वाढलेला चीनचा शांघाय कम्पोझिट निर्देशांक शुक्रवारी १.९३ टक्क्यांसह वाढला. तर शेनझेन कम्पोझिट निर्देशांक १.८७ टक्क्यांनी उंचावला.
जगातील दुसऱ्या अर्थव्यवस्थेतील भांडवली बाजाराच्या सावरण्यामुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स २६ हजारावर तर निफ्टी ८ हजारापुढे पोहोचला आहे. वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी तर निर्देशांकांनी कमालीची उसळी नोंदविली.