देशाच्या भांडवली बाजारात सर्वाधिक उलाढाल असलेल्या आणि बाजारमूल्याच्या तुलनेत जागतिक स्तरावर ११ व्या क्रमांकावर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) च्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चित्रा रामकृष्णन यांनी सोमवारी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. आतापर्यंत त्या एनएसईच्या सह-व्यस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होत्या.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेपासून त्याच्याशी नाळ जुळलेल्या चित्रा रामकृष्णन या सनदी लेखापाल असून, एनएसईच्या स्थापनेपासून आजतागायत प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या त्या तिसऱ्याच व्यक्ती आहेत. त्यांच्याआधी सन २००० पासून एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी म्हणून रवी नारायण हे काम पाहत होते. सोमवारपासून रवी नारायण हे बिगर कार्यकारी संचालक व उपाध्यक्ष म्हणून एनएसईच्या संचालक मंडळावर कायम असतील.
प्रारंभापासून नाळ..
आयडीबीआय ही राष्ट्रीय शेअर बाजाराची प्रवर्तक असून, या भांडवली बाजाराचे पहिले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या आर. एच. पाटील यांच्याबरोबर आयडीबीआयमधून आलेल्या पहिल्या पाच कर्मचाऱ्यांमध्ये रवी नारायण आणि चित्रा रामकृष्णन यांचा समावेश होता. संस्थापक पहिल्या पिढीच्या या दोन्ही प्रतिनिधींकडे पाटील यांच्यापश्चात या बाजाराच्या नेतृत्त्वाची धुरा क्रमाने आली आहे. एनएसईच्या उपकंपन्या असलेल्या इंडिया इंडेक्स प्रॉडक्ट अॅण्ड सव्र्हिसेस (बाजाराच्या वेगवेगळ्या निर्देशांकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या) आणि ‘केवायसी’च्या व्यवसायात असलेल्या डॉटेक्स या कंपन्यांच्या संचालक मंडळांवरही चित्रा रामकृष्णन कार्यरत आहेत. जगभरातील मोठय़ा आणि महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये वरिष्ठपदी असलेल्या मोजक्याच महिलांमध्ये चित्रा रामकृष्ण यांची गणना केली जाते. त्याचबरोबर महिला प्रमुखपदी असलेल्या जगभरातील शेअर बाजारांमध्ये जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका), शेन्झेन (चीन) यांच्यानंतर आता भारतात एनएसईच्या प्रमुखपदी महिलेची नेमणूक झाली आहे.