चोलामंडलम इन्व्हेस्टमेण्ट अ‍ॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड (चोला)ने महाराष्ट्रात चार नव्या शाखांचा शुभारंभ केला आहे. त्यापैकी दोन शाखा या चेंबूर आणि डोंबिवली (मुंबई व ठाणे जिल्हा) असून एक चाकण (पुणे) आणि एक सिन्नर (नाशिक) इथे आहे. चोलाचे व्यवस्थापकीय संचालक वेल्लायन सुबिहा यांच्या उपस्थितीत या शाखांचे उद्घाटन नुकतेच झाले.

‘चोलाच्या सध्या महाराष्ट्रात ५४ शाखा असून जोडीला आणखी नवीन शाखा चालू करून सर्व तालुके आणि तहसीलमधल्या आणि भविष्यातल्या टप्प्यांमधल्या शाखांचे अस्तित्व अधिक दृढ बनवण्याचे उद्दिष्टय़ यानिमित्ताने जाहीर करण्यात आले. सर्व टिअर ३ आणि ४ शहरांमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा मनोदय असून महाराष्ट्रातल्या संभाव्य ग्राहकांना सेवा पुरवण्याचे ध्येयही नमूद करण्यात आले. या नव्या ४ शाखांमुळे ‘चोला’च्या पश्चिम विभागातल्या शाखांची संख्या १६८ झाली असून मार्च २०१७ पर्यंत शाखांची संख्या २०० वर नेण्याचा कंपनीचा मनोदय स्पष्ट करण्यात आला आहे.

शाखा विस्तार कार्यक्रमाच्या वेळी बाफना मोटर्सचे अध्यक्ष बालू बाफना, पवार ऑटोमोबाइल्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहन पवार, जितेंद्र ऑटोमोबाइल्सचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र आणि एक्सेल मोटर्सचे अध्यक्ष अजय गर्ग उपस्थित होते.

यावेळी ‘चोला’चे व्यवस्थापकीय संचालक वेल्लायन सुबिहा म्हणाले, सध्याच्या ग्राहकांबरोबरचे संबंध दृढ करून आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचून महाराष्ट्रातले आपले अस्तित्व अधिक ठाशीव आणि व्यापक बनवणे, हे आमचे उद्दिष्टय़ आहे. तर ‘चोला’च्या वाहन वित्त विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख रवींद्र कुंडू म्हणाले, ‘आमच्या शाखाविस्ताराच्या उपक्रमाला गती देणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वैयक्तिक सेवा आणि सर्वोत्तम ग्राहकानुभव होय.

राष्ट्रीय पातळीवर चोलाच्या ७० टक्के शाखा या ग्रामीण भागात, २० टक्के शाखा निमशहरी भागात तर १० टक्के शाखा हा शहरी भागात आहेत. कंपनीच्या ग्राहकांची संख्या ७.५ लाख इतकी आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या विकास योजनेचा एक भाग म्हणून ‘चोला’ने भारतभरात १५० हून नव्या शाखा उघडण्याचे ठरवले आहे. सध्या भारतभरात ६१७ शाखा असणाऱ्या ‘चोला’ला या आर्थिक वर्षांत शाखांची संख्या ७०० करायची आहे.

‘चोला’ हा १९०० मध्ये स्थापन झालेल्या २९,५०० कोटी रुपयांच्या मुरूगप्पा समूहाचा एक व्यवसाय आहे. समूहाचे एकूण २८ उद्योग असून भांडवली बाजारात सूचिबद्ध ९ कंपन्यांचा समावेश आहे.