भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयच्या पश्चिम विभागीय कार्यकारिणीच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत २०१४-१५ सालासाठी अध्यक्ष म्हणून स्टीलकास्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन तांबोळी यांची निवड करण्यात आली. उद्योजक कुटुंबात तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तांबोळी यांनी व्यापार व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळविीली आहे. सीआयआय-गुजरात राज्याचे अध्यक्ष तर पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी सांभाळल्या आहेत. सीआयआयच्या पश्चिम विभागाचे नवे उपाध्यक्ष म्हणून कार्यकारिणीने किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किलरेस्कर यांची निवड केली आहे. अमेरिकेतील इलिनॉइस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून किलरेस्कर यांनी मॅकेनिकल इंजिनीयरची पदवी प्राप्त केली असून, ते भारत सरकारच्या व्यापार मंडळाचे सदस्य म्हणूनही सध्या कार्यरत आहेत.
न्यायमूर्ती श्रीकृष्ण ‘एफपीएसबी’च्या अध्यक्षपदी
भारतात वित्तीय नियोजनकारांसाठी व्यावसायिक मानदंडांची रचना करणाऱ्या ‘फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड्स बोर्ड’ अर्थात ‘एफपीएसबी इंडिया’चे अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने नियुक्त केलेल्या ‘वित्तीय क्षेत्र वैधानिक सुधारणा आयोगा’चे अध्यक्ष म्हणून दोन वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर न्या. श्रीकृष्ण यांनी हा नवीन पदभार सांभाळला आहे. त्यांच्या आधी निवृत्त वेतन नियमन व विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष धीरेंद्र स्वरूप हे एफपीएसबीचे अध्यक्ष होते.