देशातील दुकाने २४ तास व आठवडय़ाचे सातही दिवस खुली ठेवण्याच्या नमुना कायद्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दुकाने, मॉल्स व चित्रपटगृहे सातही दिवस २४ तास खुली ठेवता येऊ शकतील.
या कायद्यानुसार उत्पादन प्रकल्प वगळता १० किंवा अधिक कामगार असलेल्या दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहे यांना ३६५ दिवस त्यांचे काम खुले ठेवण्याची परवानगी दिली जाईल व त्यांना संबंधित आस्थापन केव्हा बंद ठेवायचे, केव्हा खुले ठेवायची यासाठी मुभा असेल.
महिलांना पुरेशा सुरक्षेत रात्रपाळीत काम करण्याची परवानगी दिली जात असून कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, उपाहारगृह, प्रसाधनगृह व प्रथमोपचार सेवा असणे आवश्यक राहील.
‘द मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट (रेग्युलेशन अँड कंडिशन ऑफ सव्‍‌र्हिसेस बिल’ २०१६) मंत्रिमंडळाकडून मंजूर करण्यात येत आहे.
या कायद्याला संसदेची मंजुरी लागणार नाही. कामगार मंत्रालयाच्या या आदर्श कायद्यानुसार राज्यांना त्यांच्या गरजानुसार बदल करता येतील. यातून रोजगारवीढीची अपेक्षा आहे, दुकाने व इतर आस्थापने चालवण्यात लवचिकता राहील.
आयटी व जैवतंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना रोज ९ तास व आठवडय़ाला ४८ तास काम असते, त्यांना यातून सूट दिली आहे. केंद्र सरकारला या कायद्याबाबत वेळोवेळी सूचना मिळाल्या होत्या व त्यानुसार हा कायदा तयार केला आहे, त्याच्या अंमलबजावणीचा विकल्प राज्यांना राहील. त्यात दुरुस्त्याही करता येतील.