रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नोटा एटीएममध्ये बसण्यासाठी यंत्रणेत बदल करण्याची संपूर्ण प्रक्रिया दोन ते तीन आठवडय़ात पार पडण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर याबाबत बँका तसेच एटीएम यंत्रणे बनविणाऱ्या आणि हाताळणी करणाऱ्या कंपन्यांकडे पर्यायी योजना नसल्याचा फटका ग्राहकांना बसल्याचे दिसून आले आहे.

अनेक एटीएममध्ये सध्या १००, ५०० व १,००० रुपयांच्या नोटेच्या आकाराचे रकाने (त्याला कॅसेट म्हणतात) असतात. मात्र नव्या ५०० व २,००० रुपयांच्या नोटेचा आकार वेगळा असल्याने तशी व्यवस्था एटीएममध्ये असणे आवश्यक आहे. मात्र याबाबत ५०० व १,००० रुपयांच्या नोटेवर बंदी आणल्यानंतर पावले उचलण्यात आली. तेव्हा आता नव्या नोटांकरिता एटीएममध्ये रचना बदलण्यासाठी विलंब लागत आहे.

प्रत्येक रकान्यात साधारणपणे २,५०० नोटांची क्षमता असते. तीन रकाने मिळून ती ७,५०० होते. रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य व्यापारी बँकांना त्यांच्या एटीएममध्ये ५० तसेच १०० रुपयांच्या नोटा ठेवण्याची सूचना नोटबंदी निर्णयाच्या काही दिवस आधीच दिल्या होत्या. मात्र एटीएममधील रकान्यांचा आकार बदलावा लागेल, असे कोणतेही संकेत न दिले गेल्याने बँकांची, एटीएम हाताळणीधारकांची ऐनवेळी तारांबळ उडाली आहे. एटीएममधील अंतर्गत रचना बदलण्याबाबत दुसरा काही पर्याय आधीच दिला असता तर ग्राहकांची अडचण झाली नसती, असे एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

देशभरातील २.२० लाख एटीएममधील यंत्रणा बदलण्याकरिता मोठय़ा संख्यने अभियंत्यांची आवश्यकता असून या प्रक्रियेला विलंब लागू शकतो, असे फिडेलिटी इन्फॉर्मेशन सव्‍‌र्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी व्यंकटचलम यांनी सांगितले.

एटीएम हाताळणी करणारे देशातील मनुष्यबळ ४०,००० असून ८,८०० वाहनांमार्फत रोकड एटीएमपर्यंत पोहोचविली जाते. सध्या हे कर्मचारी अतिरिक्त वेळ काम करत असल्याची माहिती ‘कॅश लॉजिस्टिक्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष रुतुराज सिन्हा यांनी सांगितले.