१८ लाख करदात्यांना धोक्याचा इशारा; नोटांबदीत बँकांमध्ये जमा ४.१७ लाख कोटींचा मागोवा घेण्याचे संकेत

निश्चलनीकरण प्रक्रियेत बँकांमध्ये जुन्या ५०० व १०० रुपयांच्या नोटांद्वारे जमा झालेल्या रकमांचा मागमूस घेतला जाईल, असा शब्द देणाऱ्या सरकारने अर्थसंकल्प सादर होताच १८ लाख करदात्यांना संशयास्पद रकमांबाबत लक्ष्य केले  आहे. प्राप्तिकर विवरणाशी मेळ नसलेल्या बँकेतील जमा ४.१७ लाख कोटी रुपयांबाबत प्राप्तिकर विभागाने ‘स्वच्छ धन  मोहिमें’तर्गत याबाबत येत्या १० दिवसांत उत्तर देण्यासही बजावले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्राप्तिकर विभागामार्फत ‘स्वच्छ धन मोहीम’ सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले आहे. याअंतर्गत ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ दरम्यान करदात्यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रोख रकमेबाबत स्पष्टीकरण करण्यास सांगितले आहे. विभागाने यासाठी संशयास्पद १८ लाख करदात्यांना सावध केले आहे. करदात्यांनी सरकारकडे दिलेल्या माहितीनुसार मेळ खात नसलेल्या ४.१७ लाख कोटींचा तपशीलही विभागाच्या संकेतस्थळावर संबंधितांसाठीच उपलब्ध असून यानुसार उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. कराबाबतच्या कारवाईची नोटीस टाळण्यासाठी ही प्रक्रिया संकेतस्थळाच्या माध्यमातूनच येत्या १० दिवसांत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

प्राप्तिकर विभागाने निश्चित केलेल्या १८ लाख करदात्यांनी त्यांच्या बँकेत जमा झालेल्या काही रोख रकमेचा तपशील या संकेतस्थळावर पाहून त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे. प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या माहितीनुसार बँक खात्यात रोखीने जमा झालेल्या रकमेबाबतच्या स्पष्टीकरणातून विभागाचे समाधान न झाल्यास करदात्यांना नोटिशीला सामोरे जावे लागेल, असेही सूचित करण्यात आले आहे. विभागाने शंका उपस्थित केलेल्या १८ लाखपैकी १३ लाख करदात्यांना गुरुवापर्यंत मेल, एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. तर उर्वरित ५ लाख करदात्यांना शुक्रवारी कळविले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान चलनातून जुन्या ५०० व १,००० रुपये बाद करण्याची मोहीम राबविली होती. या दरम्यान १.०९ कोटी बँक खात्यात २ लाख ते ८० लाख रुपये जमा झाल्याचे बुधवारच्या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले होते. संघटित क्षेत्रातील एकूण ४.२ कोटी नोकरदारांपैकी प्राप्तिकर विवरणपत्र भरणारे अवघे १.७४ वैयक्तिक प्राप्तिकरदाते असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते. २०१५-१६ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या ३.७ कोटी वैयक्तिक प्राप्तीकरदात्यांपैकी ९९ लाख करदात्यांनी वार्षिक करपात्र उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी दाखविले होते. तर २.५ ते ५ लाख रुपये करपात्र उत्पन्न दाखविणाऱ्यांची संख्या १.९५ कोटी होती.