’ ५५० अंशांनी लोळण घेऊन सेन्सेक्स ३६ हजारांखाली;  ’ गुंतवणूकदारांना १.७१ लाख कोटींना फटका

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याला ७३ खालील घेरी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीचा पिंपामागे ८५ डॉलपर्यंतचा भडका भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांना मोठय़ा आपटीसह त्यांचे महत्त्वाचे टप्पे सोडण्यास बुधवारी निमित्त ठरला.

व्यवहारात ३५,९११.८२ अंश सत्रतळ नोंदविणारा सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ५५०.५१ अंश घसरणीसह ३५,९७५.६३ पर्यंत खाली आला. तर सत्रात १०,८४३.७५ अंश नीचांक गाठल्यानंतर निफ्टी १५०.०५ अंश आपटीनंतर १०,८५८.२५ वर स्थिरावला.

सत्रअखेर दीड टक्क्याने घसरलेल्या सेन्सेक्समुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या १.७१ लाख कोटी रुपये संपत्तीचा ऱ्हास झाला. सर्वात जुन्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य १४३.७१ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

रिझव्‍‌र्ह बँकेने रोकडसुलभतेच्या दिशेने पाऊल टाकल्यानंतर सप्ताहारंभीत मुंबई निर्देशांकात जवळपास ३०० अंश भर पडली होती, तर मंगळवारी बाजारात व्यवहार बंद होते. बुधवारपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर बदलासाठी पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक सुरू झाली असतानाच रुपयाने ७३ ची वेस ओलांडली. काळ्या सोन्याने चार वर्षांतील गाठलेल्या तळाचा हा परिणाम होता.

सरकारने दुसऱ्या अर्ध वित्त वर्षांत कर्जउभारणीचे आपले उद्दिष्ट कमी केले असले तरी रोख्यांवरील व्याज सातत्याने वाढत आहे; शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता असल्याने भांडवली बाजारात दोलायमान स्थिती उत्पन्न झाल्याचे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी नोंदविले आहे.

नीचांकी रुपयामुळे माहिती तंत्रज्ञानसह वाहन, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांवर विक्री दबाव राहिला. भक्कम डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही समभागांसह येस बँक, वेदांता, कोल इंडिया, ओएनजीसी, बजाज ऑटो आदींचे मूल्य वाढले. तर पोलाद, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम, भांडवली वस्तू आदी क्षेत्रीय निर्देशांक दोन टक्क्यांपर्यंत वाढले.

महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ६.६६ टक्के घसरणीसह सेन्सेक्समध्ये सर्वात वर राहिला. त्याचबरोबर टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो, सन फार्मा, आयटीसी, स्टेट बँक आदी घसरणीच्या यादीत राहिले.

रुपयाचा विक्रमी नीचांक

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाने बुधवारी ऐतिहासिक तळ गाठला. एकाच व्यवहारातील ४३ पैशांच्या आपटीने स्थानिक चलन ७३.३४ वर स्थिरावले. अमेरिकी चलनासमोर रुपयाची हतबल घसरण गेल्या काही सत्रांपासून कायम आहे. बुधवारी व्यवहारात त्याने पहिल्यांदाच ७३ ची वेस ओलांडताना डॉलरमागे ७३.४२ असा विक्रमी तळ नोंदविला.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच पिंपामागे ८५ डॉलपर्यंत झेपावल्याने रुपयावर दबाव निर्माण झाला. भारतातील भांडवली बाजारातील निधीऱ्हास आणि व्यापार तूट वाढण्याची धास्ती या रूपात उमटली. रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून तेल कंपन्यांना कार्यरत भांडवलाकरिता अतिरिक्त त्वरित म्हणून विदेशी निधी उभारणीचा पर्याय बुधवारीच खुला केला.

तेलाचा ८५ डॉलरचा उच्चांक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती गेल्या चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. लंडनच्या बाजारात काळे सोने प्रति िपप थेट ८५ डॉलपर्यंत जाऊन धडकले.

खनिज तेलाच्या किमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. एकटय़ा सप्टेंबरमध्ये त्या जवळपास १० टक्क्यांपर्यंत, तर जानेवारी २०१८ पासून त्या १३ टक्क्यांपर्यंत झेपावल्या आहेत.

अमेरिकेमार्फत इराणवरील निर्बंध तारीख नजीक येत असतानाच खनिज तेलाच्या किमतींमधील उठाव लक्षणीयरीत्या नोंदला जात आहे. तसेच भक्कम अमेरिकी डॉलरचाही इंधनावर परिणाम आहे.

प्रति पिंप ८५ डॉलरनजीक पोहोचलेल्या खनिज तेलाच्या किमतीचा गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च टप्पा आहे. एप्रिल २०१८ पासून खनिज तेलाचे दर तब्बल २० टक्क्यांनी झेपावले आहेत.