पुणे : सहकारी बँकांची प्रतिमा उंचावण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) यांची दक्ष संचालक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे उद्गार माजी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांनी येथे काढले. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या कॉसमॉस बँकेने आयोजित केलेल्या ‘सहकारी बँकांमधील सनदी लेखापाल संचालक’ या विषयावरील परिषदेचा समारोप प्रभू यांच्या भाषणाने झाला.

सहकारी क्षेत्रातील बँका या व्यावसायिक दृष्टिकोन, सतत प्रगती, गुणवत्ता, आक्रमक विपणन, उत्तम कार्यप्रणाली, विश्वासार्हतेने चालाव्यात, अशी अपेक्षा या वेळी प्रभू यांनी व्यक्त केली. कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये काम करताना वैयक्तिक दृष्टिकोन न ठेवता समाजाला सेवा देण्याचा हेतू ठेवणे अत्यंत आवश्यक असून गुणात्मक विकास आणि नफा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगतिले.

अधिकारांचे विकेंद्रीकरण हे प्रगतीच्या दृष्टीने हिताचे असल्याचे नमूद करून आपल्या नियंत्रणामध्ये नसलेल्या गोष्टींवर वेळ न घालवता नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर भर देत कामकाजात सुधारणा करण्याची अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून काळानुरूप त्यांनी सतत बदलत राहिले पाहिजे, असे त्यांनी या वेळी नमूद केले.