सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने कामगारांना कामगिरीशी निगडित बक्षीस (पीएलआर) वेतन म्हणून प्रत्येकी ६८,५०० रुपये दिवाळीच्या तोंडावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ कोल इंडिया आणि तिच्या आठ उपकंपन्यांमधील दोन लाख ६२ हजार कामगारांना मिळणार आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० सालासाठी मंजूर या ‘बोनस’साठी कंपनीकडून १,७०० कोटी रुपये खर्ची घातले जातील, असे कोल इंडियाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही बोनसची रक्कम कामगारांच्या खात्यात २२ ऑक्टोबरपूर्वी जमा केली जाईल, असेही सांगण्यात आले. गत वर्षी कंपनीने प्रदान केलेल्या पीएलआर वेतनात यंदा ५.८७ टक्क्यांची म्हणजे प्रति कामगार ३,८०० रुपयांची वाढ झाली आहे. सेवेत कमीत कमी ३० दिवस भरलेल्या सर्व बिगर-कार्यकारी श्रेणीच्या सर्व कामगारांना योग्य त्या प्रमाणात या बोनससाठी पात्र ठरतील.