कोका कोला या जगप्रसिद्ध कंपनीने ‘मिनिट मेड पल्पी संत्रा’ हा नवा फ्लेवर ग्राहकांसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. ‘मिनिट मेड पल्पी संत्रा’ या फ्लेवरमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पिकवलेल्या संत्र्यांचा वापर करण्यात आला आहे. ‘मिनिट मेड मोसंबी’ हा फ्लेवर बाजारात यशस्वी झाल्यानंतर आता कोका कोला कंपनीने मिनिट मेड संत्रा या फ्लेवरची घोषणा केली.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमधील उत्तम दर्जाच्या संत्र्यांचा रस हा या नव्या फ्लेवरमध्ये असणार आहे. पल्पी ऑरेंज ग्राहकांना खऱ्याखुऱ्या संत्र्यांच्या चवीचा अनुभव देणार आहे, अशी माहिती कोका कोला कंपनीने दिली आहे. ४०० मिलीच्या पॅकमध्ये पल्पी संत्रा ऑरेंज हा फ्लेवर बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मिनिट मेड पल्पी संत्रा फ्लेवरचा लाँचिंग सोहळा पार पडला.

‘मिनिट मेड पल्पी संत्रा’ या नव्या फ्लेवरमुळे दोन राज्यांमधील फलोत्पादन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कोका कोला कंपनीने भारतात पिकवल्या जाणाऱ्या विविध फळांचे फ्लेवर्स शीतपेयांमध्ये आणि फळांच्या रसांमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोका कोला कंपनीचा भारतात स्वतःचा ‘बॉटलिंग प्लांट’ आहे. हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेसतर्फे भारतातील ४ लाख शेतकऱ्यांसोबत आणि फळ वितरकांसोबत प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत या शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फळे कशी पिकवावीत आणि त्याचे वितरकांकडून वितरण कसे केले जाईल हे शिकविण्यात येत आहे. फलोत्पादन प्रक्रिया वाढ होऊन फळ उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा आमचा उद्देश आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झाले पाहिजे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. हाच दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही काम करत आहोत, असेही कोका कोला कंपनीने म्हटले आहे.

ज्या शेतकऱ्याच्या शेतातीत संत्र्यांपासून या ज्युसची निर्मिती करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्याला मिनिट मेड पल्पी संत्रा या फ्लेवरच्या लाँचिंगच्या कार्यक्रमात या फ्लेवरची पहिली बाटली देण्यात आली, ज्या शेतकऱ्याच्या शेतातील संत्र्यांपासून या ज्युसची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करून त्याला सक्षम करणे हा महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे. कोका कोला आणि जैन इरिगेशनसारख्या कंपन्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत याचा आनंद होतो आहे. शेतीची गुणवत्ता आणि आधुनिक शास्त्रीय शेतीच्या दृष्टीने या कंपन्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत आहेत हेदेखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केले.

कोका कोला कंपनीची ही भूमिका फलोत्पादन व्यवसायाला चालना देणारी ठरेल. भारत आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी महत्त्वाची आहे. २०२२ पर्यंत शेतीचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यांच्या भूमिकेला साजेसे काम कोका कोला आणि जैन इरिगेशनसारख्या कंपन्या करत आहेत, हे महत्त्वाचे आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोका-कोला कंपनीला त्यांच्या कामात सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्राच्या रुपाने आयुष्यभरासाठी एक भागीदार लाभला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तळटीप – बातमीत देण्यात आलेली माहिती ‘कोका कोला’ कंपनीच्या डिजिटल मॅगझिनवर आधारलेली आहे.