सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात सीबीडीटीने अत्यंत धक्कादायक विधान करताना भारताच्या थकीत कररकमेपैकी ९७ टक्के रक्कम वसूल होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. ही रक्कम ४ लाख ६६ हजार कोटी रुपये इतकी आहे.
काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने, काही कंपन्या दिवाळखोरीत निघाल्याने, तर काही ठिकाणी करदात्यांना शोधणे अशक्य असल्यामुळे करवसुली करणे अशक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यमान स्थितीतील धोके लक्षात घेऊन सीबीडीटीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
थकीत करदात्यांची बँकखाती गोठविणे, करविषयक कायद्यांद्वारे वारंवार करचुकवेगिरी करणाऱ्यांना अटक करणे अशा उपायांद्वारे या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एप्रिल २०१२ अखेर एकूण थकबाकी ४ कोटी ८२ लाख २७ कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी मार्च २०१३ अखेर, ४ लाख ६६ हजार ८५४ कोटी रुपयांची वसुली होणे अशक्य असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, गतवर्षीही करसंकलनात अपयश आले होते. एकूण थकबाकीपैकी अवघे ५ टक्के करसंकलन करण्यात गतवर्षी यश आले होते. ही महसुली तूट भरून काढण्यासाठी अर्थ मंत्रालयातर्फे अधिक कठोर पावले उचलण्यात येतील, अशी आशा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 4:10 am