बस उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या एमजी समूहाने कंपनीचा पहिला टरमॅक कोच अर्थात विमानतळावर धावपट्टीपर्यंत प्रवाशांना वाहून नेणारी बस ‘कोलबंस’चे अलीकडेच अनावरण केले. अल्ट्रा-लो फ्लॅट फ्लोअर, कल्पक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या केबिन आणि प्रवाशांना सहजपणे ये-जा करता येईल, अशी द्वाररचना कोलंबसमध्ये करण्यात आली आहे. विश्वासार्ह ड्राइव्ह लाइन्स, पूर्णपणे संयुक्त आणि गळती प्रतिबंधक रूफ पॅनेल, आकर्षक अंतर्गत सजावट, एलईडीची सुंदर प्रकाशयोजना यामुळे हे उत्पादन जागतिक दर्जाचे झाले आहे. १२ मीटर लांबीच्या या कोचमध्ये ७० प्रवासी (आठ बसलेले आणि ६२ उभे) प्रवास करू शकतात. ईसीएएस, एबीएस आणि कॅन बस यंत्रणेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त असलेला हा कोच विमानतळावरील हाताळणी नियमांनुसार बनवण्यात आला आहे, अशी तिची वैशिष्टय़े कोलंबसच्या अनावरणप्रसंगी एमजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कामत यांनी सांगितली. सध्या डिझेलवर चालणाऱ्या कोलंबसमध्ये लवकरच सीएनजी आणि इलेक्ट्रिक ड्राइव्ह प्रणाली तयार केली जाणार आहे. भारतात हवाई प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वार्षिक पातळीवर अंदाजे २० टक्क्य़ांनी वाढत असून त्यामुळे टरमॅक कोचेसची मागणीही वाढत आहे. सध्याची मागणी पाहता चालू वर्षांत एक लाख बसेसच्या निर्मितीचा टप्पा कंपनी गाठेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.