‘मफतलाल’ व्यापार-चिन्हाच्या गैरवापराबद्दल ३०० जणांना नोटिसा
मुंबई: अरविंद मफतलाल समूहातील अग्रणी कंपनी मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडने फौजदारी कलमांखालील कारवाईचा इशारा देणाऱ्या कायदेशीर नोटिसा सुमारे ३०० वस्त्र निर्माते, वितरक आणि विक्रेत्यांना बजावल्या आहेत. या मंडळींकडून निम्न दर्जाच्या आणि बनावट उत्पादनांसाठी ‘मफतलाल’ या व्यापार-चिन्ह आणि बोधचिन्हाचा गैरवापर होत आला आहे, असे कंपनीने या नोटिसांमध्ये म्हटले आहे. मुंबई, इचलकरंजी, अहमदाबाद, भिवंडी, भिलवाडा, सूरत आणि दक्षिणेत इरोड व केरळमधील व्यापाऱ्यांना या नोटिसा बजावल्या गेल्या आहेत. मफतलाल नाममुद्रा असलेल्या उत्पादनांनी ग्राहकांमध्ये इतक्या वर्षांत निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचा, चिन्हांची हुबेहूब नक्कल करून गैरफायदा उठविला जात असल्याचा कंपनीचा दावा आहे.
‘इंडिया बुल्स’कडून गृहकर्जावरील
व्याजदरात कपात
मुंबई : इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या गृह कर्जावरील व्याजाचे दर कमी केले आहेत. मर्यादित कालावधीसाठी प्रचलित १०.१५ टक्क्यांऐवजी १०.१० टक्के दराने कंपनीने नवीन ग्राहकांना गृहकर्ज देऊ केले आहे. प्रामुख्याने ५० लाखांपेक्षा कमी रकमेच्या गृहकर्जासाठी हा सवलतीतील दर येत्या १५ एप्रिल २०१५ पर्यंत मंजुरी मिळविणाऱ्या ग्राहकांना लागू होईल. स्थिर आणि बदलत्या अशा दोन्ही व्याजदरांच्या पर्यायाच्या कर्जाना नवीन दर लागू होईल.
एल्डर फार्माकडून २६ कोटींच्या अनुशेषांचा भरणा
मुंबई : औषधी क्षेत्रातील एल्डर फार्मास्युटिकल्स लिमिटेडने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ), उगमस्थानी केलेली कर कपात (टीडीएस), ईएसआयसी योगदान तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (एमएलडब्ल्यूएफ) वगैरै मिळून २६ कोटी रुपयांचा भरणा केला असल्याचे, मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराला सूचित केले आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी आपल्या ३० ब्रँड्सची टोरेंट फार्माला विक्री करण्याबरोबरच, देशांतर्गत कार्यरत संपूर्ण कर्मचारी वर्गही हस्तांतरित केला आहे. एल्डरने या व्यवहारापश्चात वैधानिक रकमांचा भरणा करण्यात राहिलेल्या अनुशेषाचाही लवकरच भरणा करणार असल्याची ग्वाही दिली आहे. कंपनीने अलीकडे ‘ओटीसी’ प्रकारातील नवीन उत्पादने बाजारात आणली असून, आर्थिक वर्ष २०१७ मध्ये १००० कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मराठी उद्योजक व्यापाऱ्यांचा चीन दौऱ्याचे आयोजन
मुंबई : चीनमधील गोन्झाव शहरात ‘कॅन्टॅन फेअर’ नावाने होणाऱ्या व्यापारी प्रदर्शनाला भेट देण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाकडून चीन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ६० वर्षांपासून आयोजित यंदाची ही कॅन्टॅन फेअरची ११७ वी आवृत्ती असून, नियोजित चीन दौरा १९ एप्रिल ते २६ एप्रिल २०१५ असा योजण्यात आला आहे. चीन-भारतदरम्यान व्यापार सौहार्द वाढत असून, चीनमधील व्यापाऱ्यांशी थेट संबंध स्थापण्याच्या दृष्टीने मराठी व्यावसायिक, उद्योजक, व्यापाऱ्यांना हा दौरा उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर यांनी व्यक्त केला.