व्यापारी बँकांकडून मोठे उद्योग व पायाभूत सुविधांसाठी होणाऱ्या पतपुरवठय़ात घट झाल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे.

मोठय़ा उद्योगांना कर्ज देण्यास बँका तयार नसल्याचे निरीक्षण नोंदवताना बँकांच्या गृहकर्ज पतपुरवठय़ात वाढ ही पोलाद, सिमेंट, उर्जा निर्मिती आणि अन्य पायाभूत सुविधा विकास यासारख्या क्षेत्रांना होणाऱ्या पतपुरवठय़ावर विपरीत परिणाम करत असल्याबद्दलही मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त केली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये उद्योगक्षेत्राला होणारा पतपुरवठा १.३ टक्क्य़ाने घसरला तर जानेवारी २०२० मध्ये मोठय़ा उद्योगांच्या पतपुरवठय़ात २.५ टक्क्य़ांची घट झाली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, मोठय़ा उद्योगांच्या थकीत बँक कर्जाच्या प्रमाणात मागील वर्षांच्या तुलनेत ५६,६१० कोटी रुपयांची घट झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. वेगवेगळ्या उद्योगांना होणाऱ्या पतपुरवठय़ाच्या अभ्यासावर आधारित मध्यवर्ती बँकेने एक टिपण प्रसिद्ध केले आहे. पत वृद्धीदरातील अलीकडील घसरण प्रामुख्याने मोठय़ा उद्योगांच्या कर्जवाटपात घट झाल्यामुळे असल्याचे निरीक्षण रिझव्‍‌र्ह बँकेने नोंदविले आहे.

मोठय़ा उद्योगांमधील वाढत्या अनुत्पादित कर्जामुळे व्यापारी बँका या उद्योगांना कर्जवाटप करत नसल्याचा प्रश्न साथीच्या आजारामुळे आणखी वाढत गेल्याचे निरीक्षण नोंदवतानाच मोठे उद्योग आणि पायाभूत सुविधा या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार वाढवितात, असे म्हटले आहे. साहजिकच मोठे उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या पतपुरवठय़ातील घट हे चिंतेचे कारण बनले आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तुलनेत लघू उद्योगांसाठीच्या पतपुरवठय़ात वाढ

नोव्हेंबर २०२० मध्ये मोठय़ा उद्योगांना करण्यात येणाऱ्या पतपुरवठय़ात बँकांकडून घट झाली असली तरी, मध्यम उद्योगांच्या पतपुरवठय़ात वाढ झाल्याची बाब नक्कीच समाधानकारक असे, याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सूक्ष्म आणि लघू उद्योगांच्या कर्जपुरवठय़ात नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान वाढ झाल्याचे हा अहवाल नमूद करतो. वर्षभरापूर्वीच्या २.८ टक्के वृद्धीदराच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये सूक्ष्म आणि लघू उद्योगांच्या कर्जपुरवठय़ात १९.३ टक्के वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वैयक्तिक कर्जदारांच्या पतपुरवठय़ात जानेवारी २०२० मधील १६.९ टक्क्य़ांच्या वाढीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये ९.१ टक्कय़ांची घट झाली आहे. बँकिंग उद्योगाने केलेल्या कर्जपुरवठय़ाच्या तुलनेत एकूण ८२ टक्के कर्जपुरवठा उद्योग क्षेत्राला होत आहे. एप्रिल २०१९ मधील सर्वाधिक ६.९ टक्क्य़ांच्या वृद्धीनंतर सातत्याने कर्जमागणीत घट होत असल्याचे निरीक्षण रिझव्‍‌र्ह बँकेने ताज्या अहवालात नोंदवले आहे.