मुंबई : करोना-टाळेबंदी दरम्यान कमी करण्यात आलेल्या कंपनी कर तसेच आस्थापनांमार्फत करण्यात आलेल्या खर्च कपातीचा लाभ सरकारलाही झाला आहे.

कंपनी करात कपात झाली असली तरी खर्चातील कपातीमुळे कंपन्यांमार्फत सरकारच्या तिजोरीत जमा होणारे कर महसूलाचे प्रमाण वाढले आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध चार हजारांहून अधिक कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १.९० लाख कोटी रुपये कंपनी कर भरला आहे. वर्षभरात त्यात ५० हजार कोटी रुपयांची भर पडल्याचे ‘एसबीआय’च्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

करोना-टाळेबंदी दरम्यान – सप्टेंबर २०१९ मध्ये सरकारने कंपनी करात ३५ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत कपात केली गेली होती. सीमेंट, टायर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना त्याचा अधिक लाभ झाला. स्टील, खते या सारख्या १५ क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांचे कर्ज ६४ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचेही अहवालात नमूद आहे. अनेक कंपन्यांच्या सरासरी महसूलात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी कर कपातीने गेल्या आर्थिक वर्षांत त्यांचे निव्वळ उत्पन्न कमालीचे वाढले आहे.