मकरंद जोशी

तु  मच्याकडे अशा काही कंपनीचे शेअर (समभाग) आहेत  का ज्यावर मिळणारा लाभांश (Dividend) तुम्ही घेत नाहीत किंवा घेतला नाही? त्याचे परिणाम काय होऊ शकतात?

दरवर्षी अनेक कंपन्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) लाभांश जाहीर करतात. कंपनी कायदा, २०१३ प्रमाणे लाभांशाची रक्कम भागधारकांपर्यंत पोहोचली नाही किंवा भागधारकांनी काही कारणास्तव लाभांशाच्या रकमेकडे दुर्लक्ष केले तर ७ वर्षांंनंतर ती रक्कम कंपनीला गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी [Investor Education and Protection Fund (IEPF)] मध्ये हस्तांतरित (transfer) करावी लागते.

कंपनी कायदा, २०१३ (२०१६ दुरुस्ती कायदा) इथे सर्वात मोठी भूमिका बजावत आहे. येथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचे शेअर (समभाग) देखील IEPF ला हस्तांतरित होतील. या दुरुस्ती कायद्यानुसार, ज्या शेअरवरील लाभांश IEPF ला हस्तांतरित झाला आहे किंवा होत आहे ते शेअरदेखील IEPF ला हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

तसे न होण्यासाठी पुढीलप्रमाणे कारणे असू शकतात :

’ भागधारकाच्या माहिती (पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी) मध्ये काही बदल झाले असल्यास आणि ती माहिती कंपनीला कळवली नसल्यास.

’ लग्न झाल्यानंतर किंवा काही कारणास्तव नाव बदलल्यामुळे लाभांश मिळाला नसल्यास.

’ एखाद्या व्यक्तीने शेअर दुसऱ्या व्यक्तीकडून विकत घेतले आणि आधीच्या भागधारकाने लाभांशाचा स्वीकार केला नसल्यास.

’ वारसा हक्काने मिळालेले शेअर.

’ लाभांशाची रक्कम फार कमी असल्याकारणाने काही भागधारक ती रक्कम घेत नाही.

’ गुंतवलेल्या शेअरकडे दुर्लक्ष केल्यास.

अशा प्रकारचीअनेक कारणे असू शकतात आणि त्यामुळे लाभांश घेतला जात नाही. अशा परिस्थितीत भागधारकांना कायद्यान्वये त्यांचे लाभांश आणि शेअर IEPF ला हस्तांतरित होत आहेत या गोष्टीची सूचना दिली जाते. जर भागधारकांनी या सूचनेकडे लक्ष दिले नाही किंवा सूचनेचे उत्तर दिले नाही तर त्यांचे लाभांश आणि शेअर IEPF ला हस्तांतरित होतात. बेवारस मालमत्ता नेहमीच अनधिकृत कार्यांचा स्रोत बनते आणि हेच टाळण्यासाठी ही कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.

जर असे काही झाल्यास ती व्यक्ती आपले लाभांश आणि शेअरच्या परतीसाठी अर्ज करू शकते. त्या अर्जाची संपूर्ण माहिती http://www.iepf.gov.in या संकेतस्थळावर आहे.

गुंतवणूकदार अनेक कंपन्यांमध्ये आपला अमूल्य असा पैसे गुंतवतात. त्या गुंतवलेल्या पैश्यातून काहीतरी नफा झाला पाहिजे अशी त्यांची आंकाक्षा असते. कंपनीला नफा झाल्यावर अनेक मोठय़ा कंपन्या आपल्या भागधारकांसाठी आणि त्यांचा कंपनीप्रती विश्वास वाढण्यासाठी लाभांश जाहीर करतात. कंपनीचे खरे मालक भागधारक असतात. भागधारकांचे संरक्षण हेच या व्यवस्थेमागील उद्दिष्ट आहे. तरीदेखील IEPF ला हस्तांतरित झालेले लाभांश आणि शेअर परत मिळवणे हे भागधारकांसाठी कष्टप्रत असू शकते. म्हणून आपला लाभांश आणि शेअर IEPF कडे जाऊ नये यासाठी गुंतवणूकदारांनी पुढील काळजी घेतली पाहिजे :

’ जेव्हा कंपनी लाभांश जाहीर करते तेव्हा त्या रकमेचा स्वीकार करा / दावा करा.

’ जर तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल झाल्यास (नाव, पत्ता इत्यादी) त्या गोष्टीची माहिती लगेच कंपनीला द्या.

’ दुसऱ्या व्यक्तीकडून शेअर विकत घेत असाल तर त्या भागधारकाने पूर्वीचा जाहीर केलेला लाभांश स्वीकार केला आहे की नाही याची खात्री करून घ्या.

पुढे दिलेल्या अहवालाप्रमाणे २०१८ – १९ या वर्षांत शेअर IEPF कडे हस्तांतरण केले गेलेले आहेत :

 तपशील १ एप्रिल पासून ते ३१ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत

IEPF  ला हस्तांतरित केलेले लाभांश  रु. १२५ .५७ कोटी

IEPF  ला हस्तांतरित केलेले शेअर   रु. ५७.१५ कोटी

वरील अहवालानुसार, प्रत्येक वर्षी लाभांशाची आणि शेअरची रक्कम IEPF ला हस्तांतरित झाली आहे.

(लेखक कंपनी सचिव आहेत.) l makarandjoshi@mmjc.in