पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत कंपनी करातून महसुलात १८.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत कंपनी कर संकलनात झालेली ही सर्वात वेगवान वाढ आहे. करापोटी उत्पन्न आणि खर्च यातील तफावत रुंदावत जाऊन, तुटीचा प्रचंड ताण असलेल्या केंद्र सरकारच्या तिजोरीसाठी हा मोठा दिलासा आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली आल्यामुळे विशेषत: उद्योग क्षेत्रात सुधारलेले करविषयक अनुपालन, करप्रणालीचे डिजिटलीकरण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सरकारी विभागांचे परस्पर आंतरजोडणी यातून एकूण करचोरीच्या प्रवृत्तीला आळा बसला असून, त्याचा परिणाम एकूण कंपनी कर संकलनात सुधारण्यात झाला आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या उत्पन्नात जुलै तसेच सप्टेंबर तिमाहीत उत्साहवर्धक सुधारणा झालेली नसली तरी बाजारात सूचिबद्ध नसलेल्या अनेक कंपन्या कर जाळ्यात आल्याने एकूण कंपनी कराच्या संकलनात वाढीचा परिणाम दिसून आला आहे. कर यंत्रणेच्या डिजिटल समर्थ आधुनिकीकरणामुळे, या नव्या कंपन्यांना करचोरी करण्याचे मार्ग बंद झाले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चालू संपूर्ण आर्थिक वर्षांत कंपनी कर आधीच्या वर्षांच्या तुलनेत १०.१ टक्क्यांची वाढ दर्शवेल, असे अर्थसंकल्पातून अंदाजण्यात आले होते. प्रत्यक्षात पहिल्या सात महिन्यांच निर्धारित वाढीचे लक्ष्य गाठले गेले आहे.