News Flash

स्पर्धक विमान कंपन्यांची ‘जेट’भरती!

जमिनीवरील खासगी नागरी हवाई सेवा कर्मचाऱ्यांसाठी रोजगार प्रस्ताव

जमिनीवरील खासगी नागरी हवाई सेवा कर्मचाऱ्यांसाठी रोजगार प्रस्ताव

मुंबई : आधीचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज परत न येण्याची शाश्वती नसलेल्या व्यापारी बँकांनी अतिरिक्त आपत्कालिन निधी देण्यास नकार दिल्यानंतर व्यवसाय ठप्प पडलेल्या जेट एअरवेजच्या बेरोजगार कर्मचाऱ्यांसाठी आता स्पर्धक कंपन्यांचेच सहकार्याचे हात सरसावले आहेत.

सरकारी कंपनी एअर इंडियाने जेटच्या ताब्यातील विमाने भाडय़ाने घेण्याच्या सज्जतेसह तिच्या आंतरराष्ट्रीय सेवेकरिता जेटच्या ‘केबिन क्रू’करिता गळ टाकला आहे. तर जेटच्या बंद पडलेल्या तिकिट विक्री केंद्र, वाहतूक सुविधेचा वापर लगेचच सुरू केलेली स्पाईसजेटही जेट एअरवेजचे कर्मचारी घेण्याच्या प्रयत्नात आहे.

थकित कर्जाचा डोंगर असलेल्या जेट एअरवेजची उड्डाणे ही बँकांचे विस्तारित अर्थसहाय्य न मिळाल्याने सुरुवातीला अंशत: तर नंतरच्या टप्प्यात पूर्णत: संस्थगित करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका अडिच दशके जुन्या कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांना बसला.

एअर इंडियाचा जेटच्या ताफ्यातील ५ विमाने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता भाडय़ाने घेण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर विमानात प्रवाशांना मार्गदर्शन व सहाय्य करणारा जेटचा ‘केबिन क्रू’ही आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्याची तयारी दाखविली आहे. जेटमुळे रद्द झालेल्या प्रवासाकरिता विशेष सवलत देऊ केली आहे.

जेटच्या जमिनीवर येण्याने स्पर्धक कंपन्यांच्या हवाई सेवेकरिता लगेचच मागणी वाढली असून ती पूर्ण करताना त्यांना कर्मचारी, साहित्य, सुविधा यांची गरज भासत आहे. परिणामी स्पाईसजेटनेही जेटची विमाने भाडय़ाने घेण्यासह कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिताही उस्तुकता दर्शविली आहे.

दरम्यान, जेटमधील कर्मचाऱ्यांचे रोजगार वाचविण्यासाठी सरकारने खासगी कंपनी ताब्यात घ्यावी, अशी सूचना बँक कर्मचारी संघटनेने केली आहे. जेट बंद होण्यापूर्वी कंपनीच्या कर्मचारी संघटनेनेही पंतप्रधानांना पत्र लिहून ‘आमची रोजी-रोटी’ कायम ठेवण्याची विनंती केली होती.

‘साई इस्टेट कन्सल्टंटस्’ची अर्ज, मुलाखत प्रक्रिया सुरू

मुंबईच्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीचा सल्लागार समूह असलेल्या ‘साई इस्टेट कन्सल्टटंन्स’ने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अर्ज तसेच मुलाखत प्रक्रियाही सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात समूहाकडे जेटच्या १०० कर्मचाऱ्यांचे अर्ज आले असून पैकी यशस्वी अर्जदारांना विविध विभागात संधी देऊ केली आहे.

मुंबई, पुणेसह सध्या चार शहरात अस्तित्व असलेल्या ‘साई इस्टेट कन्सल्टटंन्स’ला चालू तिमाहीत आणखी चार शहरांमध्ये विस्तार करावयाचा असून समूहाचे ५०० कर्मचारी भरतीचे लक्ष्य असल्याचे समूहाच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख सलोमी पिटर्स यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:30 am

Web Title: competitor airlines offer job to unemployed jet airways employees
Next Stories
1 सोने आयात रोडावली ; २०१८-१९ मध्ये ३ टक्के प्रमाण कमी
2 सेवानिवृत्तीच्या तयारीत भारत पहिल्या स्थानावर..
3 ‘जेट’ उड्डाणस्थगनानंतर.. विमान समभागांत उलथापालथ
Just Now!
X