माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह विविध शाखांतील ठेवीदार संघ सक्रिय

मुंबई : बांधकाम व्यावसायिक वाधवान कुटुंबाशी संबंधित एचडीआयएल या कंपनीची आर्थिक परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून बिकट असतानाही त्यांना दिलेली कर्जे अनुत्पादक (एनपीए) श्रेणीत न दाखवणे, कर्जवाटपात त्यांच्यावर मेहरनजर करणे यामुळेच पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक अडचणीत आली असून या प्रकारांची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे. तशी तक्रारही सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.

पीएमसी बँकेच्या सायन आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमधील काही ठेवीदारांनी एकत्र येत, बँकेच्या व्यवस्थापनाविरोधात पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत.

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांकडे किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पत्र दिले. त्या नंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत, पीएमसी बँकेची लूट करून ९.१२ लाख ठेवीदारांना संकटात लोटणाऱ्या बँकेच्या व्यवस्थापनावर आणि एचडीआयएलच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी सोमय्या यांची मागणी आहे.

पीएमसी बँकेच्या ८ हजार कोटी रुपयांच्या कर्जवितरणापैकी तीन हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज एचडीआयएलला किंवा त्यांच्या बेनामी कंपन्यांना देण्यात आली आहेत. एचडीआयएल २०१८ पासून आर्थिकदृष्टय़ा संकटात असतानाही पीएमसी बॅंकेने त्या कंपनीला वित्तपुरवठा केल्याचे दिसत आहे. बँकेच्या व्यवस्थापनालाच याचा दोष जातो, असे नमूद करीत सोमय्या यांनी रिझव्‍‌र्ह बॅंकेने पीएमसीच्या व्यवहारांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण करावे, असे म्हटले आहे.

सरदार तारासिंह यांचा मुलगा संचालक मंडळावर

भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचे पुत्र सरदार रणजितसिंह हे पीएमसी बँकेवर संचालक आहत. राज्य सहकारी बँकेच्या कर्जप्रकरणांत आजी-मार्जी संचालकांवर कारवाई सुरू आहे. त्याच धर्तीवर सरदार रणजितसिंह व इतर संचालकांवर कारवाई का होऊ नये, असा सवाल सोमय्या यांना करण्यात आला. त्यावर या प्रकरणात सर्व संचालक मंडळ दोषी आहे असे आताच म्हणता येणार नाही. त्यासाठीच चौकशी होऊन स्पष्ट दोषारोप झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे उत्तर सोमय्या यांनी दिले.

नफ्यातील शाखांबाबत विशेष धोरणाची मागणी

बँकेतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण असते. त्याचा उपयोग करून संबंधित ठेवीदारांना आताच पैसे देऊन टाकावेत. त्याचबरोबर पीएमसी बँकेच्या जवळपास १२० शाखांचा व्यवसाय हा नफ्यात आहे. अशा शाखांमधील खातेदार-ठेवीदारांना विशेष बाब म्हणून पैसे मिळतील, अशी उपाययोजनेची सोमय्या यांनी मागणी केली.