करोना टाळेबंदीच्या काळातील आर्थिक ताण कमी करण्यासाठी कर्ज हप्त्यांच्या परतफेडीला स्थगितीचा लाभ घेतलेल्या कर्जदारांना त्यांच्या हप्त्यांमधील व्याज रकमेवरील व्याज (चक्रवाढ व्याज) सरकारने माफ केला आहे. प्रत्यक्षात हा लाभ अत्यंत नगण्य असेल आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकांवर मात्र अतिरिक्त कामाचा बोजा पडेल, अशी बँकिंग वर्तुळात प्रतिक्रिया आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, २ कोटी रुपये आणि त्यापेक्षा कमी रक्कम फेडणे शिल्लक असलेल्या आणि २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत नियमित (स्टँडर्ड) कर्ज खाते असलेल्या कर्जदारांना ही सवलत मिळणार आहे. शिवाय संपूर्ण व्याजमाफी नव्हे तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील तफावतीचा लाभ कर्जदारांना दिला जाणार आहे. प्रत्यक्षात ‘लाभ’ म्हणून सांगितली जाणारी रक्कम छोटय़ा कर्जदारांसाठी अत्यंत तुटपुंजी असेल, असे मत महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष आणि राज्य मध्यवर्ती (शिखर) बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद मिळवून देणे हे सरकारच्या हाती आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच १४ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत नमूद केले आणि सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्यास फर्मावल्यानंतर, ही योजना आणली गेली. सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस चाललेल्या वादविवादानंतर आलेली ही योजना म्हणजे डोंगर पोखरून उंदीर शोधून काढल्यासारखीच असल्याची टिप्पणीही अनास्कर यांनी केली.

अर्थमंत्रालयाने ५ नोव्हेंबरच्या आत कर्जदारांच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्याचे बँकांना आदेश दिले आहेत. सरकारकडून नंतर या रकमेची बँकांना परतफेड केली जाणार आहे. त्यामुळे आगामी १० दिवसांत पात्र कर्जदारांची माहिती संकलित करणे, लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे, या व्यवहाराचे लेखापरीक्षण करून घेणे, लेखा परीक्षकांच्या प्रमाणपत्रासह केंद्राकडे परतफेडीसाठी दावा दाखल करणे, तो मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे अशी बँकांवर जबाबदारी येईल, पर्यायाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे, असे अनास्कर यांनी स्पष्ट केले.

सवलतीचा लाभ कितपत ?

गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड थकबाकी, वाहन कर्ज, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई कर्ज, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज अशा प्रकारच्या कर्जदारांना १ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीतील हप्त्यांसाठी ही व्याज सवलत योजना आहे. सोबतच्या कोष्टकातील उदाहरणात, ३० लाखांचे गृहकर्ज वार्षिक ७.५० टक्के दराने घेतलेल्या कर्जदाराला, चक्रवाढ पद्धतीने व्याज वर्षांला ७.६० टक्के इतका पडेल. म्हणजे दोहोंतील तफावत म्हणून १ मार्च ते ३१ ऑगस्ट या सहा महिन्यांसाठी ०.०५ टक्के इतकाच फरक पडेल. अगदी दोन कोटींच्या महत्तम मर्यादेत कर्ज घेतलेल्यांना जेमतेम १०,००० रुपयांची सवलत मिळेल. अनेक लहान कर्ज खात्यांवर (ज्यांनी हप्ते स्थगितीचा लाभ घेतला नाही त्यांना)  १०० रुपयांपर्यंतही सवलत मिळणार नाही, असे अनास्कर यांचे मत आहे. कर्ज प्रकार,