टॅब, नोटबुक या सारख्या पर्यायांना भारतीय ग्राहकांनी दिलेली पसंती संगणकांच्या (पीसी) मागणीला मारक ठरली आहे. सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीदरम्यान संगणकांची मागणी २.२ टक्क्यांनी खालावत २१.४० लाखांवर येऊन ठेपली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपकरणांच्या बाजारपेठेवर नजर ठेवणाऱ्या ‘आयडीसी’ने जाने ते मार्च २०१६ मधील २१.९० लाख संगणकांच्या देशांतर्गत मागणीत तिमाहीगणिक घट झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ही घसरण २.२ टक्क्य़ांची आहे. जानेवारी ते मार्च या २०१६ मधील पहिल्या तिमाहीतही मागणीत अवघी ७.२ टक्के वाढ झाली होती. असे असले तरी सण समारंभाची तिमाही असलेल्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान संगणकांची मागणी पुन्हा एकदा वाढेल, असा विश्वास ‘आयडीसी इंडिया’चे वरिष्ठ बाजार विश्लेषक मनीष यादव यांनी व्यक्त केला आहे.

शहरी भागातील मागणी स्थिर असली तरी यंदाच्या कालावधीत ग्रामीण भारतातून व्यक्तिगत संगणकांची मागणी वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे. यंदा चांगला झालेला पाऊस, सातवा वेतन आयोग आणि एकूणच ग्रामीण भागावरचा अर्थसंकल्पीय भर, ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने सुरू असलेले मार्गक्रमण हेही कॉम्प्युटर मागणीच्या पथ्यावर पडेल.

 

भारतात संगणकाच्या बाजारपेठेतील हिस्सेदारी

Untitled-18