11 August 2020

News Flash

‘कॉग्निझन्ट’ची घोडदौड टीसीएसचे अव्वल स्थान डळमळवणारी ठरेल काय?

बहुतांश भारतीय तंत्रज्ञ सेवेत असलेल्या आणि भारतातच सेवा केंद्रे फैलावलेल्या पण अमेरिकेत न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या कॉग्निझन्ट टेक्नॉलॉजीज सोल्यूशन्सने तिमाहीगणिक आर्थिक कामगिरीत सरशी

| May 6, 2015 06:48 am

बहुतांश भारतीय तंत्रज्ञ सेवेत असलेल्या आणि भारतातच सेवा केंद्रे फैलावलेल्या पण अमेरिकेत न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या कॉग्निझन्ट टेक्नॉलॉजीज सोल्यूशन्सने तिमाहीगणिक आर्थिक कामगिरीत सरशी साधणे सुरूच ठेवले असून, २०१५ सालच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीच्या निकालांनी भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांना खूप मागे टाकणारे निष्कर्ष नोंदविले आहेत. भारतातून आऊटसोर्सिंग क्षेत्रात सर्वाधिक महसूल मिळविण्यात कॉग्निझन्टने काही तिमाहीपूर्वी इन्फोसिसला पिछाडीवर टाकून दुसरे स्थान मिळविले आणि तिची नजर अव्वलस्थानी असलेल्या टीसीएसवर असून उभयतांमधील दरीही उत्तरोत्तर कमी होत आहे.
सरलेल्या मार्च तिमाहीत टीसीएसने एकूण महसुलात १.६ टक्क्यांची माफक वाढ नोंदविली, त्या उलट कॉग्निझन्टचा महसुली वाढीचा तिमाही दर ४ टक्के आहे. आजवर निकाल जाहीर करणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजीजने सर्वाधिक २.७ टक्क्यांच्या महसुली वाढीच्या दरापेक्षाही तो अधिक आहे. अर्थात मार्च २०१५ अखेर कॉग्निझन्ट एकूण वार्षिक महसूल १२.२४ अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे, जो टीसीएसकडून मार्च २०१६ रोजी गाठला जाणे अपेक्षित असलेल्या १८ अब्ज डॉलरच्या महसुलाच्या तुलनेत सध्या खूप कमी असला तरी कॉग्निझन्टची सध्या सुरू असलेली घोडदौड टीसीएसला बैचेन करणारी निश्चितच असेल.
उल्लेखनीय म्हणजे कॉग्निझन्टने नवीन कर्मचारी भरतीत प्रतिस्पर्धी भारतीय कंपन्यांना मात दिली आहे. तिमाहीत या कंपनीने ६,२०० नवीन कर्मचाऱ्यांना सामावून घेतले, त्या उलट टीसीएसबाबतीत हाच आकडा १,०३१ इतकाच आहे.

भारतीय आयटी समभागांना उसनी उभारी!
कॉग्निझन्टने सोमवारी जाहीर केलेल्या दमदार नफ्याच्या निकालांच्या परिणामी नॅसडॅकवर सूचिबद्ध या समभागाने ११ टक्क्यांच्या उसळीसह सार्वकालिक उच्चांकी स्तर गाठला. कॉग्निझन्टने आपल्या पूर्वअंदाजित संकेतांपेक्षा अधिक २०.२ टक्क्यांची वार्षिक महसुली वाढ नोंदविली, तर आगामी आर्थिक वर्षांतही कंपनीकडून स्व-अंदाजाला मात देणारी कामगिरीचे अंदाज आघाडीच्या दलाली पेढय़ांनी व्यक्त केले आहेत. अपेक्षेपेक्षा सरस निकालांचा परिणाम कॉग्निझन्टच्या प्रतिस्पर्धी भारतीय आयटी कंपन्यांसाठी मंगळवारी सकारात्मक ठरला. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेकच्या समभागांनी घसरणीच्या बाजारातही अर्धा टक्का ते अडीच टक्क्यांची वाढ दाखविली. पण ती अल्पजीवी ठरली आणि नफा पदरी बांधताना झालेल्या यापैकी काही समभागांचा भाव घसरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2015 6:48 am

Web Title: congisten technology quarterly results
टॅग Business News
Next Stories
1 नफेखोरीने तेजी अल्पजीवी
2 व्होल्टास एअर कूलर उत्पादन निर्मितीत
3 बाजारहिस्सा दुपटीने वाढविण्याचे ‘व्हिडीओकॉन’चे लक्ष्य
Just Now!
X