05 August 2020

News Flash

व्याजदर कपातीच्या आशा पल्लवित!

रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी द्विमासिक पतधोरण येत्या ७ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.

मुंबई : वाढती महागाई, उद्योगधंद्यांचे ढासळते चक्र यामुळे आणखी एकवार व्याजदर कपात अटळ मानली जात आहे. दर कपातीची ही आशा शुक्रवारी भांडवली बाजारातील व्यवहारातही पल्लवित होत निर्देशांकांनी सप्ताहअखेर तेजीने केली. तर विश्लेषकांनी ०.४० टक्क्यांपर्यंत कपातीचे कयास बांधले आहेत.

गुंतवणूकदारांना अपेक्षा

तीनशे अंश वाढीने सेन्सेक्स आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात ३७,४०० नजीक पोहोचला. तर शतकी निर्देशांक वाढीसह निफ्टी ११,१०० च्या उंबरठय़ावर आहे.

ऑगस्टमधील किरकोळ महागाई निर्देशांक वाढल्याचे गुरुवारी जाहीर झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कपात करेल या आशेवर शुक्रवारी भांडवली बाजाराचे व्यवहार तेजीसह झाले.

अमेरिका-चीन व्यापार युद्ध शमत असल्याचे आशियाई भांडवली बाजारांनी केलेल्या स्वागताच्या जोडीला येथील संभाव्य दरकपातीचीही जोडही निर्देशांक तेजीला मिळाली.

परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत ७१ पुढील भक्कम रुपयाचीही दखल गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरच्या व्यवहारात घेतली. प्रमुख निर्देशांकांनी सलग सप्ताहभर वाढ नोंदविली आहे. चालू सप्ताहात सेन्सेक्सने ४०३.२२ अंश तर निफ्टीने १२९.७० अंश भर नोंदविली आहे. टक्केवारीत हे प्रमाण एक टक्क्याहून अधिक आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी द्विमासिक पतधोरण येत्या ७ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर प्रत्यक्षात व्याजदर बदलाबाबतचा निर्णय होईल. चालू वित्त वर्षांसाठी महागाई दराचा किमान २ टक्के व कमाल ४ टक्के असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेने गृहीत धरला आहे. २०१९ वर्षांत आतापर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेने सलग चार वेळा व्याजदर कपात केली आहे. गेल्या वेळी अचानक थेट ०.३५ टक्के दरकपात करण्यात आली होती.

विश्लेषकांचेही एकमत

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग पाचव्यांदा व्याजदर कपात केली जाण्याबाबत विविध बाजारतज्ज्ञ, दलाली पेढय़ांच्या विभागप्रमुखांमध्येही एकमत असल्याचे दिसून येते.

वाढती महागाई व्याजदर कपातीसाठी आशा निर्माण करत असून या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न रिझव्‍‌र्ह बँकेला करता येईल, अशी अपेक्षा जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केली आहे.

वाढती महागाई, घसरते औद्योगिक उत्पादन यामुळे ऑक्टोबरमधील रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत व्याजदर कपातीबाबत आशा असून ०.४० टक्के रेपो दर कपात होऊ शकते, असे जपानी वित्तसेवा कंपनी नोमुराच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात व्यापारी बँकांचे कर्ज स्वस्त होण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुख दरांमध्ये कपात होणे आवश्यक असून यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा तर्क बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने मांडला आहे. आघाडीच्या अमेरिकी बँकेने हा अंदाज थेट ०.५० टक्क्यांपर्यंत उंचावला आहे.

आघाडीच्या दलाली पेढी – कोटक सिक्युरिटीजच्या ताज्या अहवालात किरकोळ महागाईचा दर येत्या काही दिवसांमध्ये वाढता राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून विकास दरही संथ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत चालू उर्वरित वित्त वर्षांत तब्बल ०.७५ टक्क्यांपर्यंत व्याजदर कपात होईल, असा अंदाज दलालीपेढीने व्यक्त केला आहे.

इक्राच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये रिझव्‍‌र्ह बँक ०.१५ ते ०.२५ टक्केपर्यंत दर कपात करेल. आर्थिक विकासाबाबतची चिंता अधोरेखित करताना पतमानांकन संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:07 am

Web Title: consumers hope for interest rate cuts by reserve bank of india zws 70
Next Stories
1 ‘ओला-उबरमुळे नाही तर ‘या’ कारणांमुळे आली मंदी’; ‘मारुती सुझुकी’च्या संचालकांचे विश्लेषण
2 अर्थव्यवस्थेला मुर्ख कहाण्यांची नाही, ठोस उपायांची गरज -राहुल गांधी
3 आनंदवार्ता… सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचा भाव
Just Now!
X