भांडवली बाजारातील घसरण नव्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाही कायम राहिली आहे. आशियाई बाजारातील निरुत्साह आणि एचएसबीसीचा भारताचा सेवा क्षेत्राचा डिसेंबरमधील घसरलेला निर्देशांक यामुळे सेन्सेक्स सोमवारी ६४.०३ अंश घसरणीसह २०,७८७.३० वर आला. मुंबई शेअर बाजाराची डिसेंबरमधील एकूण वाढ गेल्या चार दिवसांतील घसरणीत परिवर्तित झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ दिवसअखेर १९.७० अंश नुकसानासह ६,१९१.४५ पर्यंत खाली आला. अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या आगामी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेचाही येथील शेअर बाजारावर दबाव राहिला.
नव्या सप्ताहाच्या सुरुवातीला आशियाई बाजारात नरम वातावरण राहिले. एचएसबीसीचा डिसेंबरमधील सेवा क्षेत्राचा निर्देशांक ४६.७ टक्क्यांपर्यंत येण्याच्या आकडेवारीने येथील बाजारातही निराशा नोंदली गेली.
गेल्या तीन सत्रांतील घसरणीनंतर नव्या आठवडय़ाची सुरुवात सकाळच्या सत्रात शेअर बाजाराने काहीशा तेजीसह केली. दुपापर्यंत ती कायम राहिली. मात्र व्यवहाराच्या उत्तरार्धात ती रोडावली.
नोव्हेंबरमध्ये सार्वकालिक उच्चांकाला पोहोचलेल्या बाजाराने डिसेंबरमध्ये एकूण ३७८.७५ अंश वाढ राखली होती. मात्र आता गेल्या सलग चार दिवसातील घसरणीचे प्रमाण हे त्यापेक्षा अधिक, ३८३ अंश झाले आहे.
सोमवारी क्षेत्रीय निर्देशांकातील निम्मे निर्देशांक घसरणीत राहिले. यामध्ये बँक, बांधकाम, ऊर्जा यांचा समावेश राहिला. सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, रिलायन्स घसरले.
‘सरकारी रोखे आकर्षक’
सरकारची चालू खात्यावरील तूट कमी होण्याबरोबरच भारताचा देशाबाहेरील व्यवहार सुधारण्याच्या आशेवर रुपया आगामी कालावधीत भक्कम होताना दिसेल. त्याचबरोबर येत्या काही कालावधीत महागाई कमी होण्याचे दृष्टिक्षेपात असल्याने रिझव्‍‌र्ह बँकही व्याजदरात पुन्हा स्थिरता अवलंबेल. यामुळेच पाच वर्षे मुदतीचे सरकारी रोखे आकर्षक दरात राहण्याचा आमचा अंदाज आहे. एकूणच या रोख्यांबाबतचे आमचे आधीचे ‘स्थिर’ मानांकन आम्ही आता ‘सकारात्मक’ करत आहोत. स्टॅण्डर्ड चार्टर्डचा अहवाल