News Flash

वादग्रस्त, घोटाळेबाज.. अन् सर्वात मोठे करदातेही!

करांचा भरणा प्रामाणिकपणे इतकेच नव्हे तर सर्वाधिक प्रमाणात करणाऱ्यांमध्ये एक ना अनेक घोटाळे-वादंगात फसलेल्या व्यक्तींची नावेच अग्रस्थानी आहेत

| December 3, 2013 08:14 am

करांचा भरणा प्रामाणिकपणे इतकेच नव्हे तर सर्वाधिक प्रमाणात करणाऱ्यांमध्ये एक ना अनेक घोटाळे-वादंगात फसलेल्या व्यक्तींची नावेच अग्रस्थानी आहेत, असे प्राप्तिकर विभागाकडून माहितीच्या अधिकाराद्वारे मिळविण्यात आलेल्या विविध वर्गवारीतील अव्वल १० करदात्यांच्या सूचीवर नजर फिरविली असता स्पष्ट होते. उल्लेखनीय म्हणजे प्राप्तिकर विभागाकडे करबुडव्यांच्या सूचीबद्दल माहिती अधिकारात विचारणा करण्यात आली होती, परंतु त्याऐवजी देशात प्रामाणिकपणे करांचा भरणा करण्याला प्रोत्साहन मिळावे या व्यापक उद्देशाने मोठय़ा करदात्यांची सूची प्रसृत करण्यास केंद्रीय माहिती आयोगाच्या दट्टय़ानंतर कर विभागाने मंजुरी दर्शविली.
माहिती-अधिकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष चंद्र अगरवाल यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये, २०११-१२ या करनिर्धारण वर्षांत वैयक्तिक करदात्यांच्या श्रेणीत पंजाबस्थित उद्योजक कमलजीत अहलुवालिया आणि प्रशांत अहलुवालिया हे कोळसा घोटाळ्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असलेल्या कमल स्पॉन्ज स्टील अ‍ॅण्ड पॉवरचे संचालकद्वय, आंध्रमधील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि संपत्ती दडविल्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगलेले जगन मोहन रेड्डी, ओडिशातील नियमबाह्य़ खाणकामाचा आरोप असलेल्या इंद्राणी पटनाईक, दक्षिण भारतातील वादग्रस्त लॉटरीसम्राट सँटिएगो मार्टिन यांचा पहिल्या दहांमध्ये समावेश आहे.
देशात सर्वाधिक वैयक्तिक मिळकत आणि पर्यायाने सर्वाधिक व्यक्तिगत कर-भरणा केलेल्यांच्या या सूचीत व्यापार-उद्योग जगतात अपरिचित असलेले शिरीन हे नाव अव्वल स्थानी आहे. त्या खालोखाल कमलजीत, जगन मोहन रेड्डी तिसऱ्या स्थानी, सँटिएगो मार्टिन सातव्या तर प्रशांत अहलुवालिया नवव्या स्थानी आहेत. सूचीतील अन्य नावांमध्ये राममूर्ती प्रवीण चंद्रा, उद्योगपती असीम घोष, खाणमालक इंद्राणी पटनाईक, मन्सूर निझाम पटेल आणि बी. रुद्रगौडा यांचा समावेश आहे.
प्राप्तिकर विभागाकडून प्रसृत या माहितीत, ‘कंपनी’ या वर्गाखाली सर्वाधिक कर-भरणा पहिल्या १० कंपन्यांमध्ये सात या सार्वजनिक क्षेत्रातील असून, खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज (चौथ्या स्थानी), पिरामल एंटरप्राइजेस लि. (सहाव्या) तर टाटा स्टील लिमिटेड (दहाव्या स्थानी) अशा केवळ तीन कंपन्या आहेत. ओएनजीसी, स्टेट बँक आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया हे या सूचीत पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), एनएमडीसी लि., भेल, एनटीपीसी असे या सूचीतील अन्य सार्वजनिक उपक्रम आहेत.
‘व्यक्ती समुदाय/सहकारी संघ’ या वर्गवारीत सर्वाधिक करभरणा करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सारस्वत, कॉसमॉस आणि शामराव विठ्ठल अशा तीन बडय़ा सहकारी बँकांचा समावेश आहे. लक्षणीय म्हणजे कृषी क्षेत्राशी संलग्न सहकारी संघांचाही यात समावेश आहे. ‘इफ्को’ हा भारतीय कृषक खत सहकारी महासंघ या सूचीत अव्वल स्थानी आहे, त्या खालोखाल आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, हरयाणा अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (हुडा), सारस्वत सहकारी बँक लि. अशी क्रमवारी आहे. कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लि. (कृभाको), कॉसमॉस सहकारी बँक लि., गुरगाव ग्रामीण बँक, शामराव विठ्ठल सहकारी बँक लि., आंध्र प्रदेश राज्य सहकारी बँक लि. आणि अ‍ॅफकॉन्स गुणानुसार भागीदारी उपक्रम असे या सूचीतील क्रमवारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 8:14 am

Web Title: controversial scams runners are the biggest tax payers
टॅग : Arthsatta,Reliance,Tax
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ महिन्याच्या उच्चांकावर!
2 तुटीचा टक्का सुधारला!
3 तेलवाहिनी देखभाल केंद्रे लवकरच सौर ऊर्जेवर