नागरी सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’ने कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी येथे येत्या १९ व २० एप्रिल रोजी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेचा मुख्य उद्देश सहकारी बँकांची आर्थिक पुनर्रचना यावर सांगोपांग चर्चा घडून यावी असा असून, फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर हे स्वागतपर भाषणांत त्यावर भाष्य करतील. फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक आनंदराव अडसूळ, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चेरगांवकर, नॅफकॅबचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांचेही उपस्थितांना मार्गदर्शन होईल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापिका सुमा वर्मा आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नागपूर विभागीय संचालिका ज्योतिका जिवानी तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या पुणेस्थित कृषी बँकिंग कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अजित कुमार यांचेही मौलिक मार्गदर्शन होईल. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी २०१५ सालासाठी सवरेत्कृष्ट बँक पुरस्कारांचे राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात येईल. सवरेत्कृष्ट बँक आणि विशेष पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांचीही उपस्थिती असेल.