किण्व आणि आंबवणाऱ्या पदार्थाच्या तंत्रज्ञानातील आधुनिकतेने मक्यासारख्या पिकाच्या अनेकांगी वापराच्या शक्यतांचीही वाट खुली केली आहे. पशुखाद्य ते दुसऱ्या पिढीतील जैवइंधन आणि जैवरसायनांच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक येथपर्यंत मक्याला उज्ज्वल भवितव्य आहेच. पण औद्योगिक जैवतंत्रज्ञानाचे सर्वात मोठे योगदान हे उत्पादन प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित कर्ब-घटकांची मात्रा व दुष्परिणाम त्यायोगे कमी केले जातील, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी केले. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)द्वारे आयोजित भारतातील पहिल्या ‘कॉर्न टेक्नॉलॉजी परिषदे’चे उद्घाटन चौधरी यांच्या बीजभाषणाने झाले.
अमेरिकेची धान्य परिषदेसह संयुक्त विद्यमाने या परिषदेचे मुंबईत १९ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण आशियाई खंडातून प्रतिनिधित्व लाभलेली ही परिषद म्हणजे आशियातील मका प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञानासाठी एक पर्वणीच आहे. प्रक्रियादार, इथेनॉल निर्माते, कॉर्न ड्राय मिलर्स त्याचप्रमाणे स्टार्च निर्माते, जैवइंधन, रसायननिर्मात्यांसाठी हा एक आंतरराष्ट्रीय मेळावाच होता.
जैवतंत्रज्ञान औद्योगिकतेवर येत्या काळात भर देणे क्रमप्राप्त ठरेल असे नमूद करून चौधरी यांनी परिसराचे पर्यावरण, पर्यायाने तेथील समुदाय आणि एकूण अर्थकारण या सर्वाना वरदान ठरणारी ही बाब ठरणार असल्याचे सांगितले. आजच्या घडीला तरी ती प्रचंड आर्थिक शक्यता असलेली परंतु न धुंडाळली गेलेली एक सुसंधी आहे, असे त्यांनी सांगितले.