कोविड-१९ प्रतिबंधित लशीच्या देशभरातील वितरण विलंबाचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याबाबतची शंका उपस्थित करण्यात आली आहे. असे झाल्यास भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन २०२१-२२ मध्ये अवघे ६ टक्केच नोंदले जाईल, असे अमेरिकी दलाली पेढीने म्हटले आहे.

सुरळीत लसपुरवठय़ाच्या जोरावर नव्या आर्थिक वर्षांत ९ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त करताना बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने लशीच्या वितरण विलंबाबाबतची भीतीही वर्तविली आहे. त्याचबरोबर महागाई आता ६ टक्क्यांच्या आत स्थिरावत असल्याने रिझव्‍‌र्ह बँक तिच्या जूनपर्यंतच्या पतधोरणात अर्धा टक्का व्याजदर कपात करेल, असेही नमूद केले आहे.

येत्या मार्चमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षांबाबत भाकीत वर्तविताना अमेरिकी दलाली पेढीने सकल राष्ट्रीय उत्पादन दर उणे ६.७ टक्के असेल, असे म्हटले आहे. हा अंदाज सरकारने व्यक्त केलेल्या उणे ७.७ टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. मोठय़ा प्रमाणातील रेपो दरकपातीसह सरकारच्या ताज्या उपाययोजना गेल्या काही कालावधीत थंडावल्या असून महागाई वाढल्याने संबंधित पावले उचलली गेल्याचे समर्थनही करण्यात आले आहे. सरकारच्या आर्थिक उपाययोजनांमुळे येत्या वित्त वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तूट ५ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

‘नव्या वित्त वर्षांत अर्थव्यवस्था सकारात्मक’

नवीन २०२१-२२ वित्त वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत देशाचा अर्थविकास दर सकारात्मक नोंदला जाण्याबाबतची आशा यूबीएस या स्विस गुंतवणूक बँकेने व्यक्त केली आहे. मात्र चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था उणेच (७.५ टक्के) राहणार असल्याचे म्हटले आहे.