करोना विषाणूबाधेच्या उपचारावर खर्चाची भरपाई म्हणून विविध विमा कंपन्यांकडे १८,१००च्या घरात अर्ज आणि आतापर्यंत २८१ कोटी रुपयांच्या दाव्यांना मंजुरीही दिली गेल्याचे स्पष्ट होत आहे. विमा दाव्यांच्या अर्जात महाराष्ट्र सर्वाधिक ८,९५० अर्जासह अग्रस्थानी, तर राष्ट्रीय राजधानी परिसर अर्थात एनसीआर ३,४७० अर्जासह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाने कोविड-१९ बाधेशी संलग्न विशिष्ट आणि अल्पमुदतीच्या (साधारण तीन महिने मुदतीच्या) वैयक्तिक तसेच गट आरोग्य विमा पॉलिसी प्रस्तुत करण्याची मुभा विमा कंपन्यांना दिली आणि त्यानंतर अनेक कंपन्यांनी या साथरोगावर संरक्षक योजना बाजारात आणल्या. १९ जून २०२० पर्यंत संकलित माहितीनुसार, शहरी भागात करोनावर उपचार खर्चाच्या विमा दाव्यांचे प्रमाण सरासरी दोन ते अडीच लाख रुपये, तर निमशहरी व ग्रामीण भागात हेच प्रमाण ५० ते ७५ हजार रुपयांदरम्यान आहे. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले असल्यास दाव्यांचे प्रमाण सहा ते आठ लाखांदरम्यान जाते.

देशभरात रुग्णसंख्या साडेचार लाखांवर गेली असताना, विमा दाव्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तथापि, विमेदार व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यानंतरच दावा दाखल करण्याचा प्रश्न उद्भवतो. मात्र केरळ, तेलंगण या सारख्या राज्यांमध्ये सरकारी तसेच खासगी रुग्णालयातही करोना बाधेवरील उपचार संपूर्णपणे मोफत असल्याने, दाव्यांचे प्रमाणही कमी असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई – महाराष्ट्राची आघाडी..

करोनाबाधेवर विमा दाव्यांचे सर्वाधिक अर्ज  ८,९५० अर्ज महाराष्ट्रातून दाखल झाले आहेत. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या सारख्या ‘लाल’ क्षेत्रातून रुग्णसंख्या मोठी त्यामुळे विमा दाव्यांचे प्रमाणही जास्त आहे. मुंबईतून ४,१५० विमा दावे, तर पुणे आणि ठाणे या शहरांतून अनुक्रमे १,६०० व १,१०० विमा दावे दाखल झाले आहेत.