24 October 2020

News Flash

करोनाकाळ विक्रमी तेजीचा!

निफ्टी-सेन्सेक्सची दशकातील सर्वोत्तम त्रमासिक वाढ

संग्रहित छायाचित्र

मंगळवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात उलटफेर होऊन दिवसाची अखेर नाममात्र घसरणीनेच झाली असली, तरी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी गत दशकभरातील सर्वोत्तम तिमाही वाढीची नोंद व्यवहाराअंती केल्याचे दिसून येते.

करोना साथीच्या संकटामुळे आर्थिक व्यवहारांवर गंभीर नकारात्मक परिणाम झाला असला तरी भांडवली बाजारातील तेजीला त्याची कोणती बाधा झाल्याचे आढळून येत नाही. अर्थव्यवस्थेच्या स्थितीच्या नेमके उलट चित्र दर्शवत दशकातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद निर्देशांकांनी या अनिश्चित मानल्या गेलेल्या काळात केली आहे. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२० या कालावधीत निफ्टी निर्देशांक १९.८ टक्क्य़ांनी, तर सेन्सेक्स १८.५ टक्क्य़ांनी वधारला आहे. तीन महिन्याच्या काळात इतकी भरीव कामगिरी एप्रिल-जून २००९ तिमाहीत निर्देशांकांनी यापूर्वी केली आहे.

या त्रमासिक विक्रमी वाढीनंतरही प्रमुख निर्देशांक वर्षांतील उच्चांकी पातळीपेक्षा (जे निर्देशांकांचे सार्वकालिक उच्चांकी शिखरही आहे) १५ टक्क्यांनी खाली आहेत. मंगळवारच्या व्यवहारात मात्र, २७३ अंशांनी झेप घेतल्यानंतरही, सेन्सेक्सने दिवसाची अखेर ४५.७२ अंशाच्या घसरणीसह ३४,९१५.८० या पातळीवर केली. निफ्टी निर्देशांकही सोमवारच्या तुलनेत १०.३० अंश खाली १०,३०२.१० स्तरावर दिवसअखेर स्थिरावला.

अर्थव्यवस्थेतील विपुल रोकडसुलभतेने निर्देशांकात वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुख्य निर्देशांकांच्या जोडीला, छोटय़ा गुंतवणूकदारांची पसंती लाभलेल्या बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात २९.२८ टक्के आणि बीएसई मिडकॅप निर्देशांकात २३.७ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, या कालावधीत परकीय गुंतवणूकदारांनी २९,६२१ कोटी रुपयांची खरेदी केली तर म्युच्युअल फंडांनी ४,०८१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १३ समभागांच्या किमतीत १९ टक्क्य़ांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकात बँकिंग निर्देशांकाने सर्वाधिक ३२ टक्के वाढ नोंदविली आहे.

नजीकच्या काळात जागतिक प्रमुख भांडवली बाजारातील रोकडसुलभता कमी होणे अपेक्षित असल्याने त्याचे परिणाम भारतीय बाजारावर होण्याची शक्यता आहे. जोवर निफ्टीची १०,४०० ते १०,२०० दरम्यानची पातळी चकवा देणारी आहे, असे नमूद करीत या पातळीवर बाजारात वादळी हिंदोळ्यांची शक्यता दिसून येते, ज्याचा परिणाम वर अथवा खाली अशा दोन्ही बाजूने तीव्र स्वरूपाची हालचाल नजीकच्या काळात अनुभवता येईल, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी यांचे अनुमान आहे.

सेन्सेक्स

३४,९१५.८०

१ एप्रिल ते ३० जून २०२०

एनएसई निफ्टी १९.८

बीएसई सेन्सेक्स    १८.५

बीएसई स्मॉलकॅप    २९.२८

बीएसई मिडकॅप २३.७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:14 am

Web Title: corona period nifty sensex best quarterly growth of the decade abn 97
Next Stories
1 चिनी गुंतवणुकीच्या ओयो, पेटीएम, ओला, स्विगीबाबतही कठोरतेची मागणी
2 बँक, वित्त फंडांचा तिमाहीत सर्वाधिक परतावा
3 सलग २१ व्या दिवशी पेट्रोल डिझेलची दरवाढ; मुंबईत पेट्रोल ८७ रूपयांवर
Just Now!
X