मार्च २०२० पासून म्हणजे करोना साथीच्या खडतर काळात अब्जाधीश मुकेश अंबांनी यांनी एका सेकंदाला केलेल्या कमाईची बरोबरी साधायला भारतातील कुशल कामगाराला तीन वर्षांहून अधिक काळ घाम गाळावा लागेल. तर अंबानी यांच्या तासाभराच्या कमाईसाठी, त्यांचे १०,००० वर्षांचे कष्टही अपुरे पडतील, असे सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ‘असमानतेचा विषाणू’ या अहवालात ‘ऑक्सफॅम’ने भारतातील विषमतेचे परिमाण मांडले आहे.

करोनापश्चात त्या त्या देशातील सरकारने अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाच्या बदलासाठी प्रयत्न केले नाहीत, तर जगाला प्रचंड मोठय़ा आर्थिक विषमता आणि त्यातून संभवणाऱ्या कुपरिणामांचा सामना करावा लागेल, असा इशारा या जागतिक स्वयंसेवी संघटनेने दिला.

येत्या आठवडय़ात जागतिक आर्थिक परिषदेने (डब्ल्यूईएफ) दावोसमध्ये आयोजित केलेल्या राजकीय व उद्योगजगतातील नेत्यांच्या ऑनलाइन मंथनाच्या पाश्र्वभूमीवर, ऑक्सफॅमने हा अहवाल प्रकाशित केला आहे.

भारतातील अव्वल १०० धनाढय़ांची संपत्ती करोनाकाळात १२,९७,८२२ कोटी रुपयांनी फुगली. भारतातील तळच्या १३.८ कोटी गरिबांना प्रत्येकी ९४,०४५ रुपयांचा धनलाभ देता येईल इतकी ही सांपत्तिक वृद्धी असल्याचे ‘ऑक्सफॅम’ने म्हटले आहे. करोना हे जगावर शतकातून एकदा ओढवलेले आरोग्य-संकट आहेच, त्यापेक्षा अधिक म्हणजे १९३० च्या महामंदीचे बरोबरी साधू शकेल असे गहिरे आर्थिक संकट त्या परिणामी येऊ घातले  आहे.

भारतातील १०० बडय़ा धनाढय़ांच्या करोनाकाळात वाढलेल्या संपत्तीवर १ टक्के दराने कर आकारला गेला तरी त्यातून गरीब व वंचितांना स्वस्त औषधे पुरविणाऱ्या जनऔषधी योजनेवरील तरतुदीत सरकारला १४० पटीने वाढ करता येईल, असे हा अहवाल सांगतो. करोना टाळेबंदीने अर्थचक्र ठप्प असतानाही, मार्च २०२० पासून अंबानी यांच्या बरोबरीने गौतम अडानी, शिव नाडर, सायरस पुनावाला, उदय कोटक, सुनील मित्तल, राधाकृष्ण दमानी, कुमार मंगलम बिर्ला, लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती वाढली असल्याचा अहवालाने नमूद केले आहे.

करोना आजारसाथीच्या सुरुवातीला सोसावे लागलेले नुकसान श्रीमंतांनी भांडवली बाजारातील उसळीमुळे लवकर भरूनही काढले. त्याउलट, जगभरातील गरिबांना हे नुकसान भरून काढण्यासाठी दशकाहून अधिक मोठा कालावधी लागेल, असे ऑक्सफॅमने म्हटले आहे.

महिला आणि वांशिक व जातधर्मदृष्टय़ा वंचितांना या संकटाचा गंभीर फटका सोसावा लागत असून, आवश्यक त्या आरोग्यसेवांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. इतकेच नव्हे तर अधिकाधिक दारिद्रय़ात ढकलले गेलेल्या या मंडळींना उपासमारीलाही सामोरे जावे लागले आहे.

– ग्रॅबिएला बूचर, कार्यकारी संचालिका, ऑक्सफॅम इंटरनॅशनल