देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात ‘एलआयसी’साठी सरलेल्या र्आिथक वर्षातील करोना काळ हा संकट नव्हे तर संधी ठरला आहे. अर्थजगतासाठी आव्हानात्मक ठरलेल्या या काळात तिची व्यावसायिक कामगिरी मात्र चमकदार ठरली आहे.

नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये एलआयसीने नवीन हप्त्यांपोटी १.८४ लाख कोटी रुपये असे आजवरचे सर्वोच्च उत्पन्न कमावले आहे. व्यक्तिगत विम्याच्या बाबतीत पहिल्या वर्षाच्या हप्त्यापोटी उत्पन्न हे ५६,४०६ कोटी रुपये आहे, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत १०.११ टक्के वाढले आहे.

एलआयसीने सरलेल्या वर्षात २.१० कोटी पॉलिसींची विक्री केली, ज्यापैकी ४६.७२ लाख पॉलिसी या केवळ मार्च २०२१ मध्ये विकल्या गेल्या आहेत. ज्याचे आधीच्या वर्षाच्या तुलनेत २९८.८२ टक्के अशी वाढ राखणारे प्रमाण आहे.

मार्च २०२१ मध्ये विकल्या गेलेल्या आणि संपूर्ण वर्षात विकल्या गेलेल्या पॉलिसींमध्ये एलआयसीचा बाजारहिस्सा हा अनुक्रमे ८१.०४ टक्के आणि ७४.५८ टक्के असे आहे. प्रथम वर्षाचा हप्त्यांच्या बाबतीत एलआयसीचा बाजारहिस्सा हा मार्च महिन्यासाठी ६४.७४ टक्के आणि संपूर्ण वर्षासाठी ६६.१८ टक्के असा आहे.

करोना काळात संचारावर निर्बंध असतानाही, दावे निवारणाच्या आघाडीवर एलआयसीने खूप आश्वाासक कामगिरी केली आहे.  एकूण १.३४ लाख कोटी रुपयांचे विमेदारांचे दावे मंजूर केले गेले, जो नवीन उच्चांक आहे. २.१९ कोटी विमाधारकांचे मुदतपूर्ती दावे सरलेल्या वर्षभरात मंजूर करण्यात आले. ९.५९ लाख मृत्यू दावे मंजूर करून, १८,१३७.३४ कोटी रुपयांची भरपाई करण्यात आली.