एप्रिलमध्ये कार, दुचाकीत मासिक तुलनेत घसरण

वाढत्या करोना साथ प्रसारामुळे लागू झालेल्या निर्बंधामुळे देशातील प्रवासी वाहन विक्रीची आकडेवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातही घसरली आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये वाहन विक्री मासिक तुलनेत १० टक्क्यांनी घसरून २.६१ लाखांवर येऊन ठेपली आहे.

देशातील एकूण प्रवासी वाहन विक्री आता जवळपास गेल्या १० महिन्यांच्या किमान स्तरावर आली आहे. वाढत्या टाळेबंदी निर्बंधामुळे अनेक वाहन कंपन्यांनी त्यांचे उत्पादन कमी केले आहे. परिणामी, वाहन मागणी आणखी काही महिने कमी नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

करोना साथ प्रसारामुळे देशात पहिल्यांदा लागू झालेल्या कडकडीत टाळेबंदीमुळे एप्रिल २०२० मध्ये एकही प्रवासी वाहन विकल्याची नोंद देशात नाही. परिणामी, एप्रिल २०२१ मधील वाहन विक्रीची तुलना आधीच्या, मार्च महिन्याशी करण्यात आली आहे. ती वार्षिक स्तरावर करण्यात आली नाही.