शितपेय बनवणाऱ्या कोका कोला या जगप्रिसिद्ध कंपनीची भारतामधील शाखा म्हणजेच ‘हिंदुस्तान कोका कोला ब्रेवरेजेस’ने (एचसीसीबी) आपल्या सात हजार कर्मचाऱ्यांना ७ ते ८ टक्के पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. एक एप्रिलपासून ही पगार वाढ लागू होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारकपात होणार असल्याचे सांगितलेले असतानाच दुसरीकडे एचसीसीबीने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. “देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या कंपनीच्या सर्व कर्चमाऱ्यांना मागील वर्षीच्या कामाच्या आधारावर पगारवाढ देण्यात आली आहे,” असं एसीसीबीच्या प्रवक्त्यांनी एका इमेलला दिलेल्या उत्तरामध्ये स्पष्ट केल्याचं ‘इकनॉमिक टाइम्स’ने आपल्या वृत्तात म्हटलं आङे.
एचबीबीसीच्या भारतामध्ये एकूण १५ ठिकाणी कारखाने आहेत. ज्यामध्ये कोका कोला, स्पाइट आणि थम्सअपसारखी शितपेय बनवली जातात. त्याचप्रमाणे मिंटमेड आणि ‘माझा’ या शितपेयाचेही उत्पादन या कारखान्यांमध्ये घेतले जाते. कंपनीच्या प्रवक्तांनी २०१९ च्या नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच करोनामुळे काम थांबल्याचे कारण देत कंपनीने कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलेले नाही. त्याचप्रमाणे करोनामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाही, असंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यंदाच्या वर्षी फटका बसणार
करोनाचा फटका कंपनीला यंदा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीमधील गुंतवणूकदारांशी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्वींसी यांनी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘भारतासारख्या बाजारपेठेमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येथे लोकं सोशल डिस्टन्सिंगमुळे बाजारात खरेदीसाठी जात नाहीयत. जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान बाजारात जाऊन आमचे उद्पादन विकत घेणाऱ्या ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये आम्हाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे.
३२२ कोटींचा नफा
मागील आठवड्यांमध्ये कोका कोला कंपनीने भारतामधील आपले काही कारखाने तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहेत. सध्या केवळ पाण्याच्या पॅकेजिंगचे काम केले जात आहे. नुकतेच करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणांवरील कारखान्यांमध्ये काम पुन्हा सुरु झाले आहे. एचसीसीबीला २०१८-१९ मध्ये ९ हजार ४५५ कोटींची कमाई झाली. त्यापैकी ३२२ कोटी हा निव्वळ नफा आहे. कोका कोला भारतामध्ये प्रामुख्याने बाटली बंद शितपेय विकण्याच्या व्यवसायामध्ये. स्वत:च्या कारखान्यांबरोबरच फ्रॅन्चायझीच्या माध्यमातूनही कोका कोला भारतामध्ये शितपेय विकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 28, 2020 12:41 pm