मुंबई : करोना विषाणूच्या प्रसाराचे केंद्र असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत चिंतेची जागतिक बाजारावर छाया असताना, स्थानिक बाजारातही त्याचे सावट सलग दुसऱ्या सत्रात मोठय़ा निर्देशांक आपटीतून दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी १८८.२६ अंश घसरणीसह ४०,९६६.८६ पर्यंत येऊन थांबला. तर ६३.२० अंश घसरणीने निफ्टी १२,०५५.८० वर स्थिरावला. मुंबई निर्देशांक आता सहा सप्ताहांपूर्वी मागे टाकलेल्या स्तरावर विसावला आहे. दिवसाच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये ४६३ अंशांपर्यंत गटांगळी अनुभवली गेली. मात्र बाजार बंद होताना, दोन्ही प्रमुख निर्देशांक सोमवारच्या तुलनेत प्रत्येकी अध्र्या टक्क्यांच्या आसपास घसरले.

सप्ताहारंभीही भांडवली बाजारात निर्देशांकांची मोठी आपटी नोंदली गेली होती. मंगळवारचे व्यवहारही घसरणीनेच सुरू झाले. अर्थसंकल्प नजीक येऊन ठेपला असताना आता कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांकडेही गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष होत आहे.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल सर्वाधिक, ४.५५ टक्क्यांनी आपटला. त्याचबरोबर टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रिज, मारुती सुझुकी, आयटीसी, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आदीही घसरले. एचडीएफसी लिमिटेड तसेच एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा यांचे मूल्य मात्र एकूण निर्देशांक घसरणीतही वाढले. क्षेत्रीय निर्देशाकांमध्ये सर्वाधिक घसरण फटका दूरसंचार क्षेत्राला बसला. हा निर्देशांक ४.११ टक्क्यांनी घसरला. तर पोलाद, ऊर्जा, वाहन आदी निर्देशांकही घसरले. तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, वित्त निर्देशांक मात्र वाढले. मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास अर्ध्या टक्क्याने घसरले.