सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. करोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउनचाही निर्णय घेण्यात आला आहे. करोना व्हायरसचा परिणाम आता सर्वत्र दिसू लागला आहे. यातून फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्याही वाचू शकल्या नाहीत. पहिल्यांदा या कंपन्यांना आपल्या महसूलात होणारी घट पाहावी लागत आहे. गेली १० वर्ष मोठी उसळी पाहिल्यानंतर करोनामुळे आता डिजिटल जाहिरतींच्या मागणीवरही परिणाम जाणवू लागला आहे. सध्या अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक युझर्स आपल्या घरांमध्येच आहेत. तसंच याकडे पाहचा जाहिरातदारही काही ठिकाणी आपला खर्च कमी करताना दिसत आहेत. इतकंच काय तर काही ठिकाणी ते शून्यावरही पोहोचलं आहे.

इंटरॅक्टिव्ह अॅडव्हर्टायझिंग ब्यूरोनुसार गेल्या १० वर्षांमध्ये डिजिटल क्षेत्रानं वार्षिक दहा अंकांमध्ये वाढ दर्शवली होती. परंतु २०१९ च्या महसुलात १२५ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं असोसिएटेड प्रेसच्या (एपी) हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. मॅग्ना रिसर्चच्या माहितीनुसार २०२० मध्ये डिजिटल जाहिरातींची वाढ कमी होऊन ती ४ टक्क्यांवर येणार आहे. परंतु या संकटाच्या काळात महसूलावर मात्र परिणाम होणार नाही. एकूण मिळून जाहिरातीची विक्री ३ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकेत डिजिटल जाहिरातीच्या मार्केटमध्ये फेसबुक आणि गुगलचं वर्चस्व ७० टक्के इतकं आहे.

अद्याप वेतन कपात नाही
गुगल आणि फेसबुकनं आतापर्यंत वेतन कपात किंवा कर्मचारी कपात करण्याचं कोणतंही पाऊल उचललेलं नाही. तर दुसरीकडे पब्लिशर्स आणि अन्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये याची सुरूवात झाली आहे. सीएनबीसीला मिळालेल्या अंतर्गत माहितीनुसार गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी २०२० मध्ये कंपनीत कोणतीही नियुक्ती केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त या वर्षी कंपनी आपल्या मार्केटिंगच्या बजेटमध्येही कपात करण्यावर विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, गुगलनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपल्या जाहिरातींमध्ये घट होत असल्यानं त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याची माहिती गेल्या महिन्यात गुगलनं दिली होती. परंतु याबाबत अधिक माहिती दिली नाही. ज्या देशात करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे त्या देशांमध्ये मेसेजिंग ट्रॅफिकमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलही दुप्पट झाले आहेत. यातून कोणतीही कमाई होत नाही आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.

तेवढ्याच वेगानं वाढणार खर्च
करोना व्हायरसमुळे प्रवासावर बंधनं आली आहेत. यामुळे जोवर करोनाचा प्रभाव कमी होत नाही तोवर गुगल आणि फेसबुकच्या विक्रीमध्ये मोठी घट कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु जेवढ्या वेगानं हा खर्च कमी झाला आहे तेवढ्या वेगानं तो पुन्हा वाढेल. यासाठी अॅडव्हान्स प्लॅनिंगची गरज नसते, असं मत एडवर्ड जोन्सचे अॅनालिस्ट डेव्हिड हेगर यांनी सांगितलं.

सध्या स्थिती उत्तम
जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर फेसबुक आणि गुगलची स्थिती उत्तम होऊ शकते असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेटकडे सध्या १२० अब्ज डॉलर्स आणि फेसबुककजे ५५ अब्ज डॉलर्स कॅश रिझर्व्ह आहे. याचा वापर करून ज्या कंपन्या या मंदीच्या काळात तग धरू शकणार नाहीत त्यांचं अधिग्रहणही करू शकतील. असंही जाणकारांनी सांगितलं.