करोनाचा परिणाम जसा जागतिक बाजारपेठेवर दिसत आहे, तसाच तो देशातील बाजारपेठेवरही दिसू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजाराच्या पडझडीचं सत्र सुरू आहे. गुरूवारीही शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता डॉलरच्या तुलनेत रूपयाही घसल्याचं दिसत आहे. गुरूवारी इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होऊन तो ७५ रूपये प्रति डॉलर्सवर पोहोचला.

देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी गुंतवणुकदारांकडून देशाच्या आर्थिक स्थितीबद्दलची भिती आर्थिक व्यवहारांमध्ये व्यक्त झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मागणी घटल्याचा परिणाम रूपयावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या अर्थव्यवस्थेवरही इतर देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे करोनाचं सावट पसरलं आहे. याचीच भीती गुंतवणुकदारांच्या मनात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या करोनाचे १६९ रूग्ण सापडले आहेत. तर जगभरात करोनामुळे ९ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

का होतेय रूपयाची घसरण?
शेअर बाजारात होणारी घसरण आणि परदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू असेलेलं विक्रीचं सत्र यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत मागील सत्राच्या तुलनेत गुरूवारी रूपयाची किंमत ७० पैशांनी घसरून तो ७४.९६ च्या स्तरावर उघडला. बुधवारी अखेरच्या सत्रात रूपया डॉलरच्या तुलनेत ७४.२६ वर बंद झाला होता.

काय आहेत कारणं ?
रूपयाची घसरण होण्याचं प्रमुख कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आहेत. भारत कच्च्या तेलाची आयात करणारा एक प्रमुख देश आहे. भारताला कच्च्या तेलाची रक्कम डॉलर्समध्ये फेडावी लागते. तर दुसरीकडे परदेशी गुंतवणुकदारांकडून होणारी विक्री हेदेखील रूपयाची किंमत घसरण्याचं प्रमुख कारण आहे.