मुंबई : चीनमधील कोरोना विषाणूचा प्रसार होत असतानाच त्याची छाया आता आर्थिक क्षेत्रावरही गडद होण्याच्या चिंतेने भांडवली बाजारांच्या प्रमुख निर्देशांकांनी गुरुवारी पुन्हा नांगी टाकली. सत्रात झेपावणारे सेन्सेक्स व निफ्टी महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रात मात्र जवळपास पाऊण टक्क्यांपर्यंत आपटले.

मुंबई निर्देशांक बुधवारच्या तुलनेत आठवडय़ाच्या चौथ्या सत्रात २८४.८४ अंशांनी घसरून ४०,९१३.८२ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३.७० अंश घसरणीसह १२,०३५.८० वर स्थिरावला.

शुक्रवारी व शनिवारी संसदेत सादर होणाऱ्या अनुक्रमे आर्थिक सर्वेक्षण व केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची प्रतिक्रिया भांडवली बाजारात उमटणे अपेक्षित आहे. एरवी शनिवारी भांडवली बाजारात व्यवहार होत नसले तरी यंदाच्या अर्थसंकल्पामुळे ते सुरू राहणार आहेत. परकीय चलन विनिमय मंच, रोखे बाजार तसेच म्युच्युअल फंड गटात मात्र व्यवहार होणार नाहीत.

महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रादरम्यान सेन्सेक्सने बुधवारच्या तुलनेत तब्बल ५५० अंशांची उसळी घेतली होती. या दरम्यान मुंबई निर्देशांक ४१,३८०.१४ पर्यंत झेपावला होता. दिवसअखेर मात्र विक्री दबाव निर्माण होत व्यवहारात ४०,८२९.९१ चा किमान स्तर नोंदविल्यानंतर तो घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्समध्ये रिलानयन्स इंडस्ट्रिज, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक आदी मोठय़ा फरकाने घसरले. तर बजाज ऑटो, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, एचडीएफसी लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी यांचे मूल्य वाढले.

मुंबई शेअर बाजारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले. त्यातही ऊर्जा, तेल व वायू, आरोग्यनिगा, पोलाद, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकातील घसरण अधिक राहिली. मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये १.२६ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदली गेली. कोरोना विषाणू घडामोडीच्या पार्श्वभूमीवर चीनमधील भांडवली बाजार गुरुवारीही बंद होते.