जानेवारीत सलग सहाव्या महिन्यात घसरणीला, व्यापार तुटीतही विस्तार

नवी दिल्ली : देशाची निर्यात सरलेल्या जानेवारी महिन्यात १.६६ टक्के घसरणीसह २५.९७ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदली गेली, निर्यात कामगिरीत घसरणीचा हा सलग सहावा महिना असून, मुख्यत: पेट्रोलियम उत्पादने, प्लास्टिक्स, गालिचे, रत्न व आभूषणांसह, चर्म उत्पादनांची निर्यात घटली आहे. चीनमधील  करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची बिघडत चाललेली स्थिती भारताच्या परराष्ट्र व्यापारासाठी धोक्याची घंटाच ठरली आहे.

निर्यातीसह देशात होणारी आयातही सलग आठव्या महिन्यांत गडगडली आहे. जानेवारी महिन्यात ती ४१.१४ अब्ज डॉलर नोंदली गेली, जी जानेवारी २०१९च्या तुलनेत ०.७५ टक्क्य़ांनी ओसरली आहे. परिणामी दोहोंतील तफावत म्हणजे व्यापार तूटही विस्तारून १५.१७ अब्ज अमेरिकन डॉलपर्यंत विस्तारली आहे. यापूर्वी जून २०१९ मध्ये व्यापार तूट ही १५.२८ अब्ज डॉलर अशा उच्चांक पातळीवर होती.

देशात होणारी सोन्याची आयात ही सलगपणे कमी होत, सरलेल्या जानेवारी महिन्यात ९ टक्के घटून १.५८ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली, त्याचा परिणाम एकंदर आयात घटण्यात आणि पर्यायाने व्यापार तूट आणखी वाढू न देण्यात योगदान राहिले. मात्र तेलाची आयात १५.२७ टक्क्य़ांनी वा निर्यातीच्या आघाडीवर ३० प्रमुख क्षेत्रांपैकी १८ प्रकारच्या वस्तूंची व सेवांच्या निर्यातीची स्थिती जानेवारीत नकारात्मक राहिली आहे. प्लास्टिक्स उत्पादनांची निर्यात तर वार्षिक तुलनेत १०.६२ टक्क्यांनी घसरली आहे.

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या १० महिन्यांत देशाच्या एकंदर निर्यातीत वर्षांगणिक १.९३ टक्क्य़ांची घसरण होऊन ती २६५.२६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. त्याच वेळी या १० महिन्यांतील एकूण आयातीचे प्रमाण ३९८.५३ अब्ज डॉलर इतके म्हणजे आधीच्या वर्षांतील याच १० महिन्याच्या तुलनेत ८.१२ टक्के अधिक आहे. २०१८-१९ सालही देशाच्या परराष्ट्र व्यापार कामगिरीसाठी यथातथाच राहिले असल्याने, या दहा महिन्यांतील व्यापार तूट १६३.२७ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा १३३.२७ अब्ज डॉलपर्यंत संकोचली आहे.

जगभरात सर्वच देशांनी अनुसरलेला बचावात्मक व देशी उद्योगांच्या संरक्षणाचा पवित्रा, तरलतेचा अभवा आणि त्यातच जगातील दुसऱ्या मोठय़ा अर्थव्यवस्थेला अकस्मात लागलेले करोना विषाणूचे ग्रहण याच्या एकत्रित परिणामी देशाच्या निर्यातीला ओहोटी लागलेली आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शरद कुमार यांनी सांगितले. वस्त्र निर्यातदारांची संघटना एईपीसीचे अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी वस्त्रोद्योगातील निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारकडून मदतीचा हात तातडीने दिला गेला पाहिजे अशी मागणी केली.