भारतात पसरत चाललेल्या करोनाच्या भीतीचं सावट शेअर बाजारावर गुरूवारीही दिसून आलं. गुरूवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजाराला सुरूवात होताच निर्देशांक तब्बल दोन अंकांनी घसरला. शेअर बाजार २७०९९.३२ अंकावर सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच २०४५.७५ अंकांनी कोसळला. तर निफ्टी ४४२ अंकांनी घसरला आहे.

करोना आजारानं जगभरातील देशांसमोर नवं संकट उभं केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलावरही करोनाचा परिणाम दिसून येत आहे. भांडवली बाजारातील मोठी निर्देशांक पडझड कायम आहे. बुधवारी (१८ मार्च) सेन्सेक्सनं एकाच सत्रात १,७०९.५८ अंशांची आपटी नोंदविताना २९ हजाराचा स्तरही सोडला. अखेर मुंबई निर्देशांक २८,८६९.५१ वर स्थिरावला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांक व्यवहारात ५०० अंश घसरणीमुळे ८,५०० च्याही खाली आला होता. निफ्टी सत्रअखेर ४९८.२५ अंश नुकसानासह ८,४६८ पर्यंत थांबला होता. गुरूवारी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच पुन्हा घसरगुंडी उडाली.

शेअर बाजार उघडताच बीएसईचा (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) निर्देशांक १७७७.१९ अंकांनी घसरला. त्यानंतर काही वेळात आणखी पडझड होऊन निर्देशांक २०४५.७५ अंकांनी कोसळला. सध्या मुंबई निर्देशांक २६,८२३.७६ अंकांवर स्थिरावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांतही ४४२.३० अंकांची घसरण नोंदवण्यात आली आहे.