जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळेच अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनदरम्यान अनेक उद्योगधंदे बंद ठेवण्यात आल्याने लाखो लोकं बेरोजगार झाली आहे. सर्व सामान्यांबरोबरच श्रीमंतांनाही करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र या परिस्थितीमध्येही काही महत्वाच्या श्रेत्रांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये घसघशीत वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. ७२ वर्षीय टिमोथी स्प्रिन्गर (Timothy Springer) या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये तर १७ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. करोनाच्या साथीमुळे श्रीमंत झालेल्या मोजक्या लोकांनामध्ये टिमोथी यांचा समावेश आहे.

हार्डवर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असणाऱ्या टिमोथी यांनी अब्जाधीश होण्याआधीच आपण भरपूर पैसा कमवला असल्याचे म्हटले होते. “सध्या मी माझ्यासाठी गरजेपेक्षा अधिक पैसा कमवला आहे. मला अजून पैश्याची गरज आहे असं मला वाटतं नाही,” असं २०१८ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टिमोथी यांनी म्हटलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती आहे तरी कोण? तर टिमोथी यांचे ‘मॉर्डर्ना आयएनसी’ या अमेरिकन कंपनीमध्ये समभाग (शेअर्स) आहेत. मॉर्डर्ना ही अमेरिकेमधील बायोटेक्नोलॉजी क्षेत्रामधील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सध्या करोनावर लस बनवण्यासंदर्भात काम करत आहे. केंब्रिज आणि मॅसॅच्युसेट्समधील या कंपनीच्या समभागांची किंमत काही दिवसांपूर्वी (२२ एप्रिल रोजी) १५२ टक्क्यांनी वाढली. त्यामुळेच टिमोथी हे अब्जाधीश झाले, असं ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सने म्हटलं आहे. टिमोथी यांच्याबरोबर करोनाच्या साथीमुळे आर्थिक फायदा झालेल्यांच्या यादीमध्ये डॉकसइन या डिजीटल कंपनीचे अध्यक्ष कीथ क्रॅच, झूम या व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅपचे एरिक युआन यांचाही समावेश आहे.

टिमोथी हे अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत विद्वानांपैकी एक आहेत. हार्डवर्ड विद्यापिठामध्ये मेडिकलचे प्राध्यापक असणाऱ्या टिमोथी यांनी १९९९ साली मिलेनियम फार्मास्युटीकल्स ही कंपनी विकत घेतील होती. त्यावेळी त्यांच्याकडे १०० दशलक्ष डॉलर होते. त्यांनी पाच दशलक्ष डॉलर मॉर्डर्नामध्ये गुंतवले २०१८ साली ही कंपनी सर्वजनिक क्षेत्रामध्ये आली. त्यानंतर टिमोथी यांचा कंपनीतील हिस्सा ८०० दशलक्ष डॉलर्स इतकी झाली.

मॉर्डर्ना कंपनीने बनवलेली एमआरएनए-१२७३ ही मानवावर प्रयोग करण्यात आलेल्या करोनाच्या सर्वात प्राथमिक लसींपैकी एक आहे. करोनावरील लसीची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेतील आरोग्य आणि मानव सेवा विभागाने मॉर्डनाला ४०० दशलक्ष डॉलरचा निधी देण्यास होकार दिला आहे. मानवावार या लसीचे प्रयोग सुरु असून हे प्रयोग यशस्वी ठरल्यास या वर्षाच्या शेवटपर्यंत कंपनी बाजारामध्ये लस उपलब्ध करुन देऊ शकते असं सांगण्यात येत आहे.

जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ७० हून अधिक लसींवर संशोधन सुरु असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारतामध्येही सायरस व अदार पूनावाला यांच्या अंतर्गत येणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये करोना लसीसंदर्भात चाचणी सुरु आहे. करोनाच्या साथीमध्ये पूनावाला बंधूंच्या संपत्तीमध्येही वाढ झाली आहे.