आघाडीची राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या व कर्नाटकात मंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या कॉर्पोरेशन बँकेने महाराष्ट्रात अस्तित्व विस्तारण्यास स्पष्ट भर दिला आहे. आगामी आर्थिक वर्षांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात किमान एक तरी शाखा उघडण्याचे बँकेचे नियोजन असून, सध्या तीन विभागीय कार्यालये आणि राज्यातील २८ पैकी १४ जिल्ह्य़ांमध्ये कॉर्पोरेशन बँकेचा शाखविस्तार आहे.
रिझव्र्ह बँकेने शाखांविषयी धोरण शिथिल करताना ते परवानगीमुक्त केल्याने कॉर्पोरेशन बँकेने राज्यातील प्रत्येक विभागीय कार्यालयाला व्यवसायाच्या गरजेनुसार १५ शाखा २०१४ साली उघडण्याचे लक्ष्य दिले आहे. ज्या जिल्ह्य़ात बँकेचे अस्तित्व नाही, त्या ठिकाणी नवीन शाखा उघडण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे कॉर्पोरेशन बँकेचे अध्यक्ष एस. आर. बन्सल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. लक्षणीय म्हणजे लघु व मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी बँकेने विशेष कार्यालयांची निर्मिती करण्याचे ठरविले असून, त्यापैकी आठव्या कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच पुण्यात करण्यात आले.
केंद्रीय अर्थमंत्रालाच्या निकषांनुसार तीन लाख कोटींचा व्यवसाय असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कार्यकारी संचालकांच्या तीन पदांना मंजुरी देण्यात येते. कॉर्पोरेशन बँकेने चालू आर्थिक वर्षांत ३१ डिसेंबरअखेर एकूण व्यवसाय तीन लाख कोटींचा टप्पा पार केल्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून कॉर्पोरेशन बँकेला तीन कार्यकारी संचालक लाभणार आहेत. विद्यमान २०१३-१४ वर्षअखेर व्यवसाय १६%ने वाढेल, अशी अपेक्षा बन्सल यांनी व्यक्त केली. कृषी कर्जे, वैयक्तिक ग्राहक कर्जे आणि लघु व मध्यम उद्योगांना दिलेली कर्जे यांचा एकूण व्यवसाय विस्तारात मोठा वाटा असेल आणि महाराष्ट्राचे या कामी लक्षणीय योगदान असेल, असे त्यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०१३ रोजी लघु व मध्यम उद्योगांना बँकेने दिलेली कर्जे २३,०६९ कोटींवर पोहचली असून, आधीच्या वर्षांच्या तुलनेत ही कर्जे ३१% वाढली असल्याचे बन्सल यांनी सांगितले.