अफवांच्या गदारोळातही कॉसमॉस बँकेच्या ठेवीत ३५० कोटींनी वाढ
प्रतिनिधी, पुणे
आमच्या बँकेच्या ठेवींमध्ये गेल्या २० दिवसांत ३५० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. हे खातेदारांच्या दृढ विश्वासाचे प्रतीक आहे. आमच्या बँकेच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही, असे कॉसमॉस बँकेचे मानद अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी सांगितले.
कॉसमॉस बँक बुडणार आहे किंवा बँकेचे विलीनीकरण होणार आहे अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सांगून डॉ.अभ्यंकर म्हणाले, की अफवांमुळे सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, छोटय़ा स्वरूपाच्या सहकारी बँका आदींनी ठेवी काढण्यास सुरुवात केली. मात्र ते प्रमाण कमी झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोझरी प्रशालेस आम्ही ४० कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्यासाठी ६० कोटी रुपयांची मालमत्ता तारण घेतलेली आहे. त्यामध्ये तळेगावच्या मालमत्तेचा समावेश नाही. तसेच, या कर्जापोटी आम्हास डिसेंबरअखेपर्यंतचे ४१ कोटी रुपयांचे धनादेश मिळालेले आहेत. त्यामुळे हे कर्ज शंभर टक्के वसूल होणार आहे, असेही डॉ. अभ्यंकर यांनी नमूद करून घोटाळ्याच्या बातम्या खोटय़ा असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले,‘रिझव्र्ह बँकेकडून नवीन शाखा सुरू करण्याबाबत पूर्वी बंधने होती, त्यामुळे आम्ही तोटय़ात असलेल्या १५ बँकांचे आमच्या बँकेत विलीनीकरण करून घेतले. या विलीनीकरणामुळे आमच्या ६० शाखा वाढल्या आहेत. अहमदाबाद व अमरावती येथील प्रत्येकी एका बँकेचा तोटा अद्याप पूर्णपणे भरुन निघाला नसला तरी लवकरच हा तोटा भरुन निघेल. अहमदाबाद येथील बँकेची ४० कोटी रुपयांची मालमत्ता आम्हास मिळाली आहे. ही किंमत आम्ही या बँकेच्या तोटय़ाबाबत धरलेली नाही, अन्यथा हा तोटा यापूर्वीच भरुन निघाला असता.
सर्व खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. ३१ मार्च २०१४ मध्ये बँकेच्या ठेवी १४ हजार ७०० कोटी रुपये होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत त्यामध्ये ११०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. बँकेस ५४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून आम्ही १२ टक्के लाभांश देण्याचीही शिफारस केली आहे. रिझव्र्ह बँकेकडून त्यासाठी परवानगीही मागितली आहे. बँकेचा राखीव निधी १३६८ कोटी रुपयांवरुन १५४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अनुत्पादित कर्जाचे प्रमाण १० टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. या कर्जाच्या वसुलीवरही भर असल्याचे त्यांनी सांगितले.

लघू वित्त बँकेची संधी हुकली तरी यूएई एक्स्चेंजचा वित्तीय उत्पादनांच्या विस्ताराचा हुरूप कायम
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />लघू वित्त बँक स्थापन करण्याची संधी हुकलेल्या यूएई एक्स्चेंजने देशात माहिती तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवा पुरविण्याचा आग्रह कायम राखत विशेषत: मोबाइल व इंटरनेटद्वारे व्यवहार करता येणाऱ्या नव्या सुविधा सुरू करण्याचा चंग बांधला आहे.
यूएई एक्स्चेंज या आबुधाबीस्थित वित्तीय सेवा प्रदाता कंपनीचे भारतात १९९९ पासून अस्तित्व आहे. गेल्या वर्षांत ७.२ अब्ज डॉलरचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या या कंपनीचा भारतीय निधी हस्तांतरण सेवा क्षेत्रात १२ टक्के बाजारहिस्सा आहे. लघुवित्त बँक परवान्यासाठी रिझव्र्ह बँकेने गेल्याच आठवडय़ात दिलेल्या प्राथमिक मंजुरीत १० कंपन्यांनाच स्थान मिळाले. मात्र संधी हुकलेल्या अन्य ७२ अर्जदारांमध्ये यूएई एक्स्चेंजही होती.
यूएई एक्स्चेंज विविध ३० बँकांच्या सहकार्याने निधी हस्तांतरण तसेच परकी चलन विनिमय व्यवहारात आहे. तिच्या देशभरात ४०० हून अधिक शाखा आहेत. कंपनीने आता ‘फ्लॅश रेमिट’ (निधी हस्तांतरण), ‘स्मार्ट पे’ (कार्डाद्वारे रक्कम देय), ‘किऑस्क’ (स्थानिक भाषेत संवाद साधणारे मशीन) आदी माहिती तंत्रज्ञानाची जोड असलेली उत्पादने देशात विकसित करण्याचे निश्चित केल्याचे यूएई एक्स्चेन्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोथ मनघट यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यासाठी कंपनी नव्या ४०० तंत्रज्ञांची नियुक्ती करीत असल्याचेही ते म्हणाले.
लघुवित्त बँक म्हणून तूर्त परवानगी मिळाली नसली तरी कंपनी आगामी कालावधीसाठी आशावादी आहे. देशात रोकडविरहित व्यवहारांचे प्रमाण गेल्या आठ वर्षांत निम्म्यावर (२० टक्के) आले असल्याचा दावा करीत या क्षेत्रात संधी असल्यानेच कंपनीही माहिती तंत्रज्ञानाशी निगडित विविध वित्तीय व्यवहार उत्पादने सादर करील, असे मनघट यांनी सांगितले.
विको लॅबॉरेटरीज ‘संवेदनशील व्यावसायिकते’च्या पुरस्काराने सन्मानित
मुंबई: मुक्या प्राण्यांबाबत करुणा बाळगून त्यांच्याप्रती संवेदनशील वर्तणूक दर्शविणाऱ्या लोकांना मुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून सन्मानित करण्यात येते. यंदा ‘पेटा’चा हा ‘कम्पॅशनेट बिझनेस’ पुरस्कार आयुर्वेदिक उत्पादनांकरिता प्रसिद्ध विको लॅबॉरेटरीजने पटकावला आहे. या पुरस्काराबद्दल बोलताना विको लॅबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर म्हणाले, ‘‘आमचे ग्राहक उत्पादनाच्या गुणवत्तेप्रती अतिशय जागरूक आहेत आणि म्हणूनच आम्हीही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेविषयक तेवढेच दक्ष असतो.’’ उत्पादनाच्या विकासात प्रयोगशालेय स्तरावर तसेच प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेतही कोणत्याही प्राण्याचा चाचणीसाठी वापर न करता व्यावसायिक यश साधले गेल्याबद्दल या पुरस्काराच्या गौरवपत्रात विको लॅबॉरेटरीजचे कौतुक केले गेले आहे. हा पुरस्कार मिळणे मोठय़ा सन्मानाचे असल्याचे पेंढरकर यांनी सांगितले. पेटाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादनांचे सखोल परीक्षण केल्यानंतर विको लॅबॉरेटरीजला हा पुरस्कार दिला असून, तो दोन वर्षांच्या अवधीकरिता ग्राह्य़ धरला जाईल.
२७ व्या महाराष्ट्र व्यापारी पेठेचे उद्घाटन
मुंबई: गणेशोत्सव ते दिवाळी असे ६५ दिवस सुरू राहणाऱ्या व मराठी व्यावसायिक व लघुउद्योगांनी घडविलेल्या उत्पादनांची पेठ अर्थात महाराष्ट्र व्यापारी पेठेचे अलीकडेच सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दादर येथील डिसिल्व्हा हायस्कूलच्या पटांगणात भरलेल्या या व्यापारी पेठेचे हे यंदाचे २७ वे वर्ष आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या पेठेच्या आयोजन करणाऱ्या मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाच्या अध्यक्षा अचला जोशी, कार्याध्यक्ष अनंत भालेकर, उपाध्यक्ष रमेश मेढेकर, किशोर रांगणेकर आदी उपस्थित होते. आजवर तब्बल सहा हजार उद्योजक या पेठेतून तयार झाले असल्याचे भालेकर यांनी सांगितले. तर यंदा पेठेला पाच लाख ग्राहक भेट देतील, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.