पुरुषांच्या वस्रप्रावरणांच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केलेल्या कॉटनकिंगने आपल्या दालनांचे शतक नुकतेच पूर्ण केले. अशा प्रकारे शुद्ध सुती पुरुषांच्या तयार कपडय़ांची १०० दालने असणारी ‘कॉटनकिंग’ ही देशातील पहिलीच विक्री शृंखला ठरली आहे. १९९६ मध्ये पुण्यापासून सुरुवात करणाऱ्या या कंपनीने आपले १०० वे दालन गोव्यात सुरू केले आहे.
आगामी योजनांविषयी माहिती देताना ‘कॉटनकिंग’चे संस्थापक प्रदीप मराठे म्हणाले की, आगामी दोन-तीन वर्षांत रिटेल दालनांची संख्या दुपटीने वाढवून ती २०० वर नेली जाणार आहे. सध्या कॉटनकिंगची दालने पुणे, मुंबईसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात कार्यरत आहेत. यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात विस्तार करण्याची योजना आहे. रिटेल दालनांचे हे विस्तारीकरण लक्षात घेऊन आमच्या तयार कपडय़ांच्या उत्पादन निर्मितीची क्षमताही वाढविण्याचा विचार आहे.
कॉटनकिंगचा अत्याधुनिक निर्मिती प्रकल्प बारामती येथील हाय- टेक टेक्स्टाइल पार्कमध्ये आहे. त्याची सध्याची स्थापित क्षमता दर दिवशी सुमारे ६,००० तयार कपडे बनविण्याची आहे. सध्याच्या प्रकल्पस्थळापासून जवळच कंपनीने सुमारे सहा एकर जागा पाहिलेली असून निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आणखी २५ कोटी रुपये गुंतविण्याचा विचार आहे, असेही त्यांनी नमूद केले.