भाववाढीच्या अपेक्षेने ‘एमसीएक्स’च्या गोदामातील साठय़ाचा विक्रम

मुंबई : देशातील कापूस उत्पादक क्षेत्रात यंदा घसरलेले पावसाचे प्रमाण पाहता, २०१८-१९ हंगामातील कापसाचे उत्पादन ११ टक्क्य़ांनी घटून ३२८ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलोग्रॅमच्या) इतके राहण्याचे कयास, ‘कॉटन इंडिया २०१९’ या भारतीय कापूस महासंघ (सीएआय) द्वारे प्रकाशित अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या हंगामात देशात ३६५ लाख गाठी इतके उत्पादन झाले होते.

गुजरात, कर्नाटक, तेलंगण,महाराष्ट्र या देशातील कापसाचे पीक घेणाऱ्या क्षेत्रात चालू वर्षांत एकूण लागवड क्षेत्र १२३ लाख हेक्टर इतके आहे, अशी सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी माहिती दिली. एकटय़ा गुजरात राज्यात २८ टक्के तुटीचा पाऊस झाला, तर महाराष्ट्र व तेलंगण राज्यात सरकारने बोंड अळीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना डिसेंबरअखेपर्यंत जितके येईल तितके पीक काढून घेण्याचे आदेश दिले, असे गणात्रा म्हणाले.

उत्पादन घसरणीच्या परिणामी यंदा आयात ७० ते ८० टक्क्य़ांनी वाढून २७ लाख गाठींपर्यंत जाईल, जे गेल्या वर्षी १५ लाख गाठी इतके होते, असे गणात्रा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान देशांतर्गत कापसाला नजीकच्या भविष्यात चांगला भाव येईल या अपेक्षेने ‘एमसीएक्स’वरील कापसाच्या वायदा व्यवहारातील स्वारस्य लक्षणीय वाढल्याचे दिसून येते, तर एमसीएक्सची स्वीकृती असलेल्या गोदामांमधील कापसाचा साठा ५ मार्च रोजी १,८१,२०० गाठी अशा सार्वकालिक उच्चांकाला पोहोचल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी याच कालावधीला ते १,१६,३०० गाठी असे होते, ज्यात यंदा ५५.८० टक्के वाढ दिसून आली.