करोना कहराची भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीर बाधा होऊन, तिचे चालू आर्थिक वर्षांत १०.३ टक्क्यांनी पतन होईल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात ‘आयएमएफ’ने मंगळवारी अंदाज वर्तविला. तथापि अर्थव्यवस्थेत फेरउसळी लगेच दिसून येईल आणि पुढील २०२१-२२ आर्थिक वर्षांत ती ८.८ टक्क्यांचा उमदा वृद्धीदर नोंदवेल असेही तिचे भाकीत आहे.

भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा स्थान कमावेल, असे आयएमएफने जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यवेध घेणाऱ्या अहवालातून निरीक्षण नोंदविले आहे. २०२१-२२ मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा भारतापेक्षा कमी ८.२ टक्के राहण्याचा तिचा कयास आहे.

आयएमएफ आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीआधी हा जगाच्या अर्थव्यवस्थेचा कल दर्शविणारा अहवाल आला आहे. जागतिक अर्थव्यवस्था चालू वर्षांत ४.४ टक्क्यांनी घसरण्याचे, तर पुढील २०२१ सालात ५.२ टक्क्यांनी फेरउसळी घेत वधारण्याचा तिचा अंदाज आहे. चालू वर्षांत, १.९ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदविणारी प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये चीनची एकमेव अर्थव्यवस्था असेल. अमेरिकेची अर्थव्यवस्था २०२० मध्ये ५.८ टक्क्यांनी गडगडेल, तर पुढील वर्षांत ३.९ टक्क्यांची वाढ नोंदवेल, असाही या जागतिक बहुस्तरीय संस्थेचा कयास आहे.